सार्वजनिक मंडळाच्या बाप्पाच्या आगमनात यंदा लालबागमधील गळक्या ब्रिजचे विघ्न पाहायला मिळतेय. पालिकेने केलेल्या तकलादू दुरुस्तीच्या कामामुळे अवघ्या काही दिवसातच या ब्रिजला पुन्हा गळती सुरू झाली आहे. लालबाग मार्पेटसमोर ब्रिजवरून मोठय़ा प्रमाणात येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे बाप्पाची मूर्ती अक्षरशः प्लॅस्टिकने झाकून नेण्याची वेळ रविवारी सार्वजनिक मंडळांवर आली. आगमन मिरवणुकांमध्ये व्यत्यय येत असल्यामुळे गणेश भक्तांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे.
मुंबईत 12 हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. गणेशोत्सव मंडळांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि पालिका प्रशासन यांच्यासोबत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक झाली होती. यात समन्वय समितीने गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी येणाऱ्या अडचणींपासून मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांचे अनेक मुद्दे मांडले होते. यात लालबागमधील ब्रिजचा देखील मुद्दा उपस्थित केला होता. समन्वय समितीच्या तक्रारीनंतर पालिकेने लालबागच्या ब्रिजची तात्पुरती दुरुस्ती केली खरी, पण निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे काही दिवसातच या ब्रिजला पुन्हा एकदा गळती सुरू झाली आहे. लालबाग मार्पेटसमोर पावसाचे पाणी ब्रिजच्या कोपऱयातून मोठय़ा प्रमाणात गळत असल्याने बाप्पाची मूर्ती अक्षरशः प्लॅस्टिकने झाकून नेण्याची वेळ मंडळांवर आली.
70 हून अधिक मंडळाच्या राजांचे आगमन
विपेंडचा मुहूर्त साधत रविवारी मुंबईचा गणराज, लोअर परळचा लाडका, खेतवाडीचा लंबोदर, कोकणचा राजा, डोंगरीचा राजा, मुंबईचा पेशवा, गौरीनंदन गौरीपाड्याचा अशा जवळपास 70 हून अधिक सार्वजनिक मंडळाच्या बाप्पांचे परळच्या गणसंकुल येथून धूमधडाक्यात आगमन झाले. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात आगमन सोहळे झाल्याने लालबागमध्ये गणेशभक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली. वाहतूक व आगमन सोहळ्याचे व्यवस्थित नियोजन करण्यासाठी समन्वय समितीचे प्रतिनिधी अमित कोकाटे, आशीष नरे, ऋषिकेश वाव्हळ, यशेष पटेल, शुभम जाधव, निखिल गावंड, पराग हतीम, गणेश गुप्ता, भूषण मढव यांच्यासह भोईवाडा, काळाचौकी पोलीस स्टेशन पोलीस, वाहतूक पोलीस आणि मंडळाचे प्रतिनिधी यांनी पुढाकार घेतला.
अजूनही शहरातील अनेक सार्वजनिक मंडळाच्या बाप्पाचे आगमन सोहळे होणार आहेत. त्यामुळे या ब्रिजची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.