लिएंडर पेसचे लक्ष्य ‘आठवे ऑलिम्पिक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 हिंदुस्थानचा सदाबहार टेनिसपटू लिएंडर पेस सलग आठव्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आतूर झाला आहे. आगामी वर्षी होणाऱया टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी आपण खडतर मेहनत घेत असल्याचे पेसने आवर्जून सांगितले.

लिएंडर पेसने गतवर्षी नाताळाच्या दिवशीच ‘2020 हे साल व्यावसायिक टेनिसच्या दृष्टीने आपल्यासाठी अखेरचे वर्ष असेल,’ अशी घोषणा केली होती. मात्र कोरोनाच्या संकटामुळे टोकियो ऑलिम्पिक वर्षभर पुढे ढकलावे लागले. त्यामुळे लिएंडर पेसलाही निवृत्तीचा कालावधी लांबवावा लागला. ‘कोरोनाची आपत्ती येईल असे कोणालाही वाटले नव्हते. या महामारीने क्रीडा विश्वाबरोबरच सर्व जग ठप्प झाले, मात्र आगामी वर्षी होणाऱया ऑलिम्पिकमध्ये काwशल्य पणाला लावण्यासाठी मी खडतर परिश्रम करत आहे,’ असे लिएंडर पेसने सांगितले.

शारीरिक, मानसिकदृष्टय़ा सज्ज

‘कोरोनाच्या संकटामुळे मैदाने, जिम बंद असल्याने आयुष्यात प्रथमच प्रदीर्घ काळाची विश्रांती मिळाली. मात्र या काळात धावपळ कमी झाल्याने शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्टय़ा सज्ज होण्यासाठी मदतच झाली. मी गेली 30 वर्षे टेनिस खेळत आहे. देशाचे नाव इतिहासात अधोरेखित होण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असतो. हिंदुस्थानकडून सर्वाधिक 7 ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्याचा विक्रम माझ्या नावावर आहे. आता आठव्यांदा या सर्वोच्च क्रीडा स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाल्यास ऑलिम्पिकच्या इतिहासात एका हिंदुस्थानी खेळाडूने सलग आठ स्पर्धेत प्रतिनिधित्व केली अशी नोंद होईल. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी मी आतूर झालो आहे, असेही पेस म्हणाला.

कोणाच्याही साथीने खेळायला आवडेल!

टोकियो ऑलिम्पिकला 23 जुलैपासून प्रारंभ होणार असून या स्पर्धेदरम्यान पेस 48 वर्षांचा होईल, परंतु वय हा फक्त आकडा असतो, असे पेसने सांगितले. ऑलिम्पिकच्या दुहेरी गटात दिविज शरण किंवा रोहन बोपण्णा यांच्यापैकी तुला कुणाच्या साथीने खेळायला आवडेल. या प्रश्नाला उत्तर देताना पेस म्हणाला, ‘आठव्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याचा विश्वविक्रम माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असेल. त्यामुळे देशासाठी खेळताना दुहेरीत कोणाच्याही साथीने खेळायला मला आवडेल. पुरुष दुहेरीत दिविज शरण असो किंवा रोहन बोपण्णा तसेच मिश्र दुहेरीत अंकिता रैनाच्या साथीनेही खेळू शकेन,’ असेही लिएंडर पेसने सांगितले.