उजव्याऐवजी डावी किडनी काढली, डॉक्टरला दोन कोटी रुपयांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशात एका डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे 56 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची गंभीर दखल ग्राहक न्यायालयाने घेत पीडित कुटुंबाला दोन कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश संबंधित डॉक्टराला दिले.

2012 साली किडनीचा त्रास होता म्हणून डॉक्टराकडे गेलेल्या महिलेची डॉक्टराने उजवी किडनी काढण्याऐवजी महिलेची निरोगी असलेली डावी किडनी काढली. 6 मे 2012 रोजी शस्त्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर रुग्णाला डायलिसिस करण्यास सांगितले गेले. डायलिसिस करूनही पोटदुखीचा त्रास सुरूच राहिल्यामुळे महिलेने इतर रुग्णालयातील डॉक्टरांनाही दाखवले. तिथे सिटी स्कॅन पार पडल्यानंतर लक्षात आले की, ज्या किडनीमध्ये लक्षणे आढळली होती, ती तिथेच होती. त्याऐवजी निरोगी असलेली डावी किडनी काढली गेली. या घटनेनंतर कुटुंबीयांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 338 नुसार गुन्हा दाखल केला. राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश ए. पी. साही आणि आयोगाचे सदस्य भरतकुमार पांड्या यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

 डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे महिला रुग्णाने आपला जीव गमावला. यामुळे मुलांना आईचे प्रेम कायमचे गमवावे लागले. तसेच महिलेचा जगण्याचा हक्कही हिरावून घेतला गेला. जर महिला रुग्णाची डावी किडनी शाबूत राहिली असती तर त्यांना अधिक आयुष्य लाभू शकले असते.