
आतापर्यंतच्या जनगणनांपेक्षा यंदाची 2021 ची जनगणना अनेक दृष्टीने खास होणार आहे. यावेळी या गणनेत ‘राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टर’मध्ये (एनपीआर) हिंदुस्थानातील रहिवाशांची माहिती बायोमॅट्रिक पद्धतीने नोंदली जाणार आहे. यामुळे जनगणनेत रहिवाशांच्या अंगठय़ाला महत्त्व आले आहे. यात रहिवाशांचा मोबाईल, आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स, व्होटर्स आयडी आणि पासपोर्ट या सगळ्यांचे नंबर्सचीही जंत्रीही असेल.
निवासस्थानाच्या दिलेल्या पत्त्यावर रहिवासी सहा महिन्यांहून जास्त काळ राहत असेल किंवा यापुढील सहा महिने वा त्यापुढील काळापर्यंत राहणार असेल त्याचीही नोंद यंदाच्या जनगणनेतील एनपीआरमध्ये केली जाणार आहे. 2015 मध्ये तो अपडेट करण्यात आला. त्यावेळी त्यात आधार, मोबाईल आणि रेशनकार्ड नंबर्स जमा करण्यात आले होते. आता 2021 मध्ये होणाऱया जनगणनेतील एनपीआरमध्ये पॅनकार्ड नंबर, ड्रायव्हिंग लायसन्स, व्होटर आयडी आणि पासपोर्ट नंबर्सही घेतले जाणार आहेत.
इच्छा असेल तरच आधार नंबर द्या!
पासपोर्ट वयाच्या कुठल्याही वर्षी काढता येतो. मात्र आधारकार्ड बनविण्यासाठी किमान वय 5 वर्षे वा त्यापुढील असावे लागते. याशिवाय एनपीआरमध्ये 18 वर्षे वा त्यावरील नागरिकांची नोंद केली जाते. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आधारकार्ड नंबर देण्याची इच्छा असेल तरच तो जनगणनेच्या वेळी देऊ शकता. तो देण्याची जबरदस्ती नसेल हेही या जनगणनेचे वैशिष्टय़ आहे. मात्र पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, व्होटर आयडी आणि पासपोर्ट नंबर देण्यास काहीच गैर नाही.
























































