
सामना प्रतिनिधी । मुंबई
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी प्रश्नोत्तराच्या तासातच स्थगन प्रस्ताव देऊन बोंडअळीच्या नुकसान भरपाईवर चर्चा करण्याची आक्रमक मागणी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सभापतींनी त्यास नकार दिल्याने आमदारांनी हौदात येऊन घोषणाबाजी सुरू केली. दोन वेळा सभागृह तहकूब करूनही विरोधकांच्या भूमिकेत फरक न पडल्याने अखेर सभागृह दिवसभरासाठी तहकूब केल्याने कामकाज ठप्प झाले.
विधान परिषदेचे कामकाज दुपारी १२ वाजता सुरू झाल्यानंतर सभापती रामराजे निंबाळकर यांनी प्रश्नोत्तरांचा सुरू करण्यास सांगितले, परंतु विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी २८९ खाली स्थगन प्रस्ताव आणून बोंडअळीची नुकसानभरपाई न मिळाल्याच्या गंभीर विषयावर चर्चा करावी अशी मागणी केली. सभापती निंबाळकर यांनी ही मागणी फेटाळून लावत प्रश्नोत्तराचा तास होऊ द्या असे सांगितले. तरीही विरोधी पक्षाचे आमदार ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. अवघ्या चार-पाच मिनिटांत सभापतींनी साडेबारापर्यंत सभागृह तहकूब केले. साडेबारा वाजता उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी कामकाज सुरू करून प्रश्नोत्तर सुरू करण्याची सूचना केली. त्यानरून पुन्हा विरोधकांनी हौदात येऊन गोंधळ सुरू केल्याने तीन मिनिटांत विधान परिपेचे कामकाज एकपर्यंत तहकूब केले.
सभागृहाचे कामकाज एक वाजता पुन्हा सुरू झाल्यानंतर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना निवेदन सादर करण्यास सांगितले. विरोधकांच्या गोंधळात त्यांनी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भातील निवेदन पटलावर ठेवले. यावेळी विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत बोंडअळीच्या स्थगन प्रस्तावावर चर्चा घेण्याची मागणी केली. या गोंधळामुळे विधान परिषदेचे कामकाज होत नसल्याने दिवसभरासाठी सभागृह तहकूब करण्यात आले.
कापसावर पडलेल्या बोंडअळीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. डिसेंबर महिन्यात सरकारने त्याची नुकसानभरपाई जाहीर करूनही अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही असा आरोप विरोधकांनी केला.

























































