पाऊलखुणा – इतिहास घडवणाऱ्या घाटवाटा

>> आशुतोष बापट

महाराष्ट्राच्या इतिहासाला सह्याद्रीने भूगोलाची जोड दिली असे म्हटले तर वावगे ठरू नये. या देखण्या पर्वतामुळे आपल्या राज्याचा इतिहास उजळून निघाला. हा इतिहास निर्मिण्यामागे जशा अनेक राजसत्ता आणि त्यातले कर्तबगार राजे कारणीभूत आहेत तसेच ही पर्वतराजी उल्लंघून जाण्यासाठी निर्मिलेल्या इथल्या विविध घाटमार्गांनीसुद्धा इथला इतिहास घडवण्यात मोलाची कामगिरी बजावल्याचे दिसते. या सगळय़ा घाटमार्गांचा मागोवा घेत असताना असे काही घाटमार्ग दिसतात की ज्यांच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या घटना घडल्या.

सातवाहनांचा नाणेघाट  

इ.स.पूर्व पहिल्या शतकापासून सातवाहनांची राजवट महाराष्ट्रावर होती. अनेक नामवंत राजे या घराण्यात होऊन गेले. त्यांचा इतिहास हा त्यांनी खोदलेल्या लेणी आणि त्यांची सापडलेली नाणी यावरून माहिती होतो. सातवाहनांच्या काळात परदेशाशी मोठय़ा प्रमाणात व्यापार चालत असे. बराचसा व्यापार हा समुद्रमार्गे असल्यामुळे विविध बंदरे महाराष्ट्रात विकसित झाली होती. शूर्पारक म्हणजेच आजचे नालासोपारा हे त्यातलेच एक महत्त्वाचे बंदर. प्रतिष्ठाणपासून ते शूर्पारक या बंदरापर्यंत जाणारा महत्त्वाचा व्यापारी मार्ग जुन्नर तालुक्यातून जात असे. याच मार्गावर जुन्नरच्या पश्चिमेला सातवाहन राजांनी एक सुंदर असा घाटमार्ग खोदून काढला. अत्यंत प्रसिद्ध असा हा नाणेघाट आजही आवर्जून पाहावा असा आहे. याच नाणेघाटात सातवाहनांनी एक अद्वितीय कलाकृती कोरून ठेवली आहे. या घाटाच्या तोंडाशी एक प्रशस्त गुहा असून त्याच्या तिन्ही भिंतींवर ब्राह्मी लिपीमध्ये शिलालेख कोरलेला आहे. सातवाहनांचा राजा सातकर्णी याची पत्नी राणी नागनिका हिने हे लेणे खोदून घेतले आणि तिच्या कारकीर्दीतील घटनांची नोंद या शिलालेखात केली आहे. या घाटाच्या तोंडाशी एक दगडी रांजण आजही पाहायला मिळतो. जकातीचा रांजण असे यास म्हटले जाते. अत्यंत रम्य परिसर लाभलेले हे ठिकाण म्हणजे आपल्या प्राचीन इतिहासाचा अमोल ठेवाच म्हणावा लागेल.

कुरवंडा घाट 

शाईस्तेखानाने पुण्यात तळ ठोकला होता आणि त्याचा एक सरदार कारतलबखान हा कोकणात उतरून शिवरायांच्या विरोधात दुसरी आघाडी उघडायला निघाला. मुघल सरदार कारतलबखान हा कल्याण-भिवंडी घेण्याकरिता लोहगड-विसापूर हे किल्ले उजवीकडे ठेवून तुंगारण्यातून कुरवंडे घाटामार्गे कोकणात जायला निघाला. खानाच्या सैन्याने हा घाट उतरायला सुरुवात केली आणि सैन्य अर्ध्या घाटात आले असेल तेव्हा प्रतिशिवाजी म्हणून ओळखला जाणारा नेताजी पालकर हा घाटाच्या वरती आपल्या सैन्यासह येऊन उभा राहिला आणि घाटाच्या पायथ्याशी स्वत शिवाजीराजे शिरस्त्राण, चिलखत घालून, हातात तलवार घेऊन घोडय़ावर स्वार होऊन खानच्या स्वागताला तयार होते. अशी परिपूर्ण नाकाबंदी केल्याने पुढे शिवाजी राजे आणि पाठीमागे नेताजी अशा कात्रीत सगळे सैन्य सापडले. रायबाघनच्या सल्ल्यावरून कारतलबखानाने महाराजांपुढे विनाशर्त शरणागती पत्करली. नि:शस्त्र होऊन खान माघारी गेला. कुरवंडा घाटामुळे शिवरायांना बलाढय़ अशा कारतलबखानावर विजय मिळवता आला. घाटाच्या पायथ्याशी असलेल्या उंबरखंड इथे आता या युद्धाचे एक सुंदर स्मारक बांधलेले आहे.

ऐतिहासिक कावळय़ा घाट 

पुणे जिह्याच्या पश्चिमेला दापसर, घोळ मार्गे गेले की कोकणदिवा नावाचा छोटेखानी, पण अतिशय सुंदर असा किल्ला आहे. या किल्ल्यावरून दुर्गदुर्गेश्वर रायगडचे एका वेगळय़ाच बाजूने फार सुंदर दर्शन होते. या कोकणदिवा किल्ल्याच्या शेजारून कावळय़ा घाट खाली कोकणात उतरतो. याच कावळय़ा घाटात एक घनघोर संग्राम झाला आणि आपल्या इतिहासाला कलाटणी मिळाली. छत्रपती संभाजीराजे यांना औरंगजेबाने पकडले आणि वढू तुळापूर इथे त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्याचवेळी राजधानी रायगडला वेढा घालायला औरंगजेबाचे सरदार निघाले. इतिकदखानाने वेढा आवळायला सुरुवात केली होती. त्याला मदत करायला शहाबुद्दीनखान निघाला, पण या कावळय़ा घाटात पायथ्याच्या सांदोशी गावातले दोन वीर, गोदाजी जगपात आणि सर्कले नाईक यांनी शहाबुद्दीनखानाशी मोठे रण मांडले. ही कावल्या-बावल्याची खिंड झुंजवली, शत्रूचे अनेक सैनिक कापून काढले. शहाबुद्दीनखानाने हाय खाल्ली आणि माघार घेतली आणि इतिकदखानाला वेळेवर मदत मिळाली नाही. या संधीचा फायदा उठवून रायगडावर असलेले राजाराम महाराज तिथून निसटून जाऊ शकले. कोकणदिव्याच्या शेजारच्या कावळय़ा घाटात हा पराक्रम घडला नसता तर राजाराम महाराजसुद्धा औरंगजेबाच्या हाती सापडले असते, पण या घाटाने महाराष्ट्राची लाज राखली, एक इतिहास रचला. हे असे घाट म्हणजे महाराष्ट्राची तीर्थक्षेत्रेच म्हणायला हवीत.

[email protected]