कराड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षाचा मुलाचा मृत्यू; परिसरात घबराट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कराड तालुक्यातील येणके येथे ऊस तोड सुरू असताना सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. मुलाला त्याने उसाच्या शिवारात सुमारे अर्धा किलोमीटर फरफटत नेले. मजुरांनी पाठलाग केल्यानंतर मुलाला तिथेच सोडून बिबट्याने धूम ठोकली. मात्र, या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला. या घटनेने कराड तालुक्यात घबराट पसरली आहे.

आकाश बिगाशा पावरा असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. कराड तालुक्यातील येणके, किरपे परिसरात ऊसतोड सुरू आहे. त्यासाठी कारखान्यांच्या ऊस मजूर टोळ्या शिवारात राहण्यास आल्या आहेत. सोमवारी सकाळी येणकेतून किरपेकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या शिवारात मजुरांची एक टोळी उसतोड करत होती.

या टोळीतील एका कुटुंबातील पाच वर्षांच्या आकाश पावरा हा मुलगा मजुरांपासून काही अंतरावर शेतात खेळत होता. त्यावेळी अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. मुलाला फरपटत बिबट्या घेऊन जात असताना हा प्रकार मजुरांचा निदर्शनास आला. त्यांनी पाठलाग सुरू केला. त्यावेळी अर्धा किलोमीटर उसाच्या फडात मुलाला सोडून बिबट्याने धूम ठोकली. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला.

तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून पाळीव जनावरांसह त्याने ग्रामस्थांवर ही हल्ला सुरू केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण आहे. दरम्यान ऊसतोड मजुरांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून बिबट्याचा वावर असल्याची माहिती एक आठवड्यापूर्वी ग्रामपंचायतीद्वारे वनविभागाला कळवली होती. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही दक्षता घेतली नाही. यामुळे आमच्या मुलाचा हकनाक बळी गेला, आम्हाला मदतीपेक्षा आमचा मुलगा महत्त्वाचा होता. मुलांसाठी आम्ही हा रोजगार करतो, वनविभाग आमचा मुलगा परत करु शकतात काय ? असा प्रश्नही मुलाच्या आईवडिलांनी व्यक्त केला आहे.