बिट्टू आणि दिदी

282

>> नम्रता पवार

मैत्री कधीही, कोणातही होऊ शकते. येऊरचा बिट्टू आणि नाशिकची दिदी. यांच्या अनोख्या मैत्रीची कहाणी.

येऊरच्या जंगलात डिसेंबर 2019 च्या सुमारास बिबटय़ाचा बछडा सापडल्याची बातमी वर्तमान पत्रांत झळकली आणि थोडय़ाच दिवसात नाशिकच्या एका शेतात अजून एक बिबटय़ाचा बछडा सापडला. या वर्तमानपत्रांतील अधूनमधून येणाऱया बातम्या. मात्र या बातम्यांमागची खरी बातमी पुढे सुरू होते. आणि इथून सुरू होतो या बिबट्यांच्या जगण्याचा, अस्तित्वाचा आणि पुनर्जन्माचा प्रवास…. जाणून घेऊया संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांच्याकडून.

बिट्टू – येऊरच्या जंगलात जेव्हा बिबटय़ाचा बछडा सापडला तेव्हा पहिले चार दिवस त्याच्या आईचा कसोशीने शोध घेण्यात आला. एकदा त्याची आई फिरकली देखील… परंतु तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती परत काही आली नाही. बछडय़ाच्या आईची वाट पाहेपर्यंत इकडे मात्र त्याची तब्बेत ढासळत होती. शेवटी आईने नाकारलेल्या या बछडय़ाला संगोपनासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आलं. 10-12 दिवसाचं हे पिल्लू अवघ्या 380 ग्रॅम वजनाचं होतं…..आणि इथूनच डॉक्टर शैलेश पेठे, श्री बाराब्दे अधीक्षक – सिंह विहार आणि कर्मचारी यांची खरी कसोटी लागली. याबाबत डॉ. पेठे सांगतात, पिल्लू खूपच अशक्त असल्यामुळे त्याला जीवनदान देणं गरजेचं होतं. त्याच्या आईचं दूध देणं शक्य नसल्यामुळे तसंच मार्जार वर्गीय प्राणी असल्यामुळे त्याला मांजरीचं दूध देण्यात आलं. हिमांशू ढोलकीया या अंध ज्येष्ठ नागरिकाने अमेरिकेतून मांजरांसाठी दिले जाणारे दूध खास मागवून दिले होते. सिरिंजने एकेक थेंब दूध त्याला पाजण्यात यायचं. पाच मिली दुधासाठी पाऊणपाऊण तास लागायचा. मात्र यानंतर आम्हा सर्वांची मेहनत सार्थकी लागली आणि या बछड्याने बाळस धरलं. आता ते साडेचार किलोचं झालंय. त्याच नामकरण ‘बिट्टू’ असं केलंय.

दिदी – नाशिकच्या एका शेतात जानेवारीच्या अखेरीस बिबट्याचं एक बछडं सापडलं तेव्हा तिथे देखील चार दिवस त्याच्या आईची वाट पाहण्यात आली आणि तिथे देखील आईने नाकारलेल्या या पिल्लाची रवानगी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात करण्यात आली. छोटय़ाशा बास्केटमधून नाशिक ते मुंबई हा प्रवास करून आलेलं हे पिल्लू 3 ते 4 आठवडय़ाचं आणि अकराशे ग्रॅमच होतं. या मादी बछडय़ाला देखील सुरुवातीला दूध पिता येत नक्हतं. सुरुवातीचे चार दिवस खूपच धाकपळीचे गेले. मात्र चार दिवसांतच ते दूध कसं प्यायचं हे शिकलं. या मादी बछडय़ाचं प्रेमाने नाव ‘दिदी’ ठेवण्यात आलय. दूध पिणाऱया दिदीच्या आहारात आता चिकन सूपची भर पडलीय.

बछडय़ांची निगा
बछडा जेव्हा येतो तेव्हा सर्वप्रथम शारीरिक तपासणी केली जाते. रक्त किती आहे, पाणी किती प्यायलाय, वजन किती आहे त्याप्रमाणे पुढील उपचार सुरू करण्यात येतात, पिल्लांच्या वजनाप्रमाणे त्यांना दिवसाला किती दूध द्यायला पाहिजे हे ठरतं. यासाठी रेस्क्यू टीम असते. त्यांचा चार्ट बनवला जातो. त्यानुसार त्यांची औषधं, खुराक ठरवला जातो. बछडय़ांचे निरीक्षण केले जाते. त्यांनी किती वेळा, किती प्रमाणात शी-सू केली हे पाहिलं जातं.

बछडय़ांचा दिनक्रम
सकाळी साडेसहाला त्यांना दूध देण्यात येतं. नंतर साडेआठ ते नऊच्या दरम्यान दोघांना कोवळ्या उन्हात ड जीकनसत्व आणि ऊब मिळावी यासाठी तासभर बाहेर फिरायला सोडलं जातं. आता थोडा उन्हाळा वाढत चालल्यामुळे लवकर आत घेतलं जातं. नंतर 10 वाजता दिदीला दूध आणि बिट्टूला चिकन दिलं जातं. नंतर मात्र दिवसभर ते आपापसात दंगामस्ती करत राहतात. पुन्हा संध्याकाळी थोडी उन्हं सरली की अर्धा पाऊण तास पुन्हा बाहेर काढण्यात येतं. या दोन बछडय़ांमध्ये दिदी खूपच मस्तीखोर आहे. बिट्टू तसा शांत असला तरी मोठा म्हणून दादागिरी दाखवत असतो.

जंगलाशी कायमचा दुरावा
बिट्टू आणि दिदी बरे झाले असले तरी आता ते कधीच इतर वन्यजीवांप्रमाणे जंगलात परतू शकणार नाहीत. कारण ते जेव्हा त्यांच्या आईसोबत असतात तेव्हा त्यांची आई दोन अडीच वर्षे त्यांना सोबत घेऊन फिरते आणि त्यांना शिकार कशी करायची, कोणाची करायची, कोणापासून स्वतःचं संरक्षण करायचं हे सर्व काही शिकवते. मात्र ही दोन्ही बछडी लहानपणीच आईपासून दुरावलेली असल्यामुळे जंगलात त्यांचा टिकाव लागणं खूपच कठीण आहे. ते स्वतःची काळजी घेऊच शकणार नाहीत. मात्र त्यांना माणसांचा विशेष लळा लागेल.

नर आणि मादी मिलनानंतर वेगवेगळे राहायला लागतात. नर हा फक्त मिलनापुरताच संबंध ठेवतो. तो पुढील कोणतीही जबाबदारी घेत नाही. मादीदेखील नराजवळ अजिबात जात नाही. नंतरदेखील दोन वर्षे त्यांच्यात संबंध राहत नाही. मादीने पुन्हा मिलनासाठी उत्सुक व्हावं, म्हणून नराला जर पिल्लं सापडली तर तो त्यांना मारून टाकतो. त्यामुळे मादी नेहमीच पिल्लांच्या संरक्षणासाठी नरापासून जरा दूरच राहते. तसंच इतर दुसऱ्या नराला जर बछडी सापडली तर तो त्यांना मारून टाकतो, कारण त्याला मादी तर हवीच असते आणि त्याच्यापासून झालेली संतती हवी असते. असं यांचं हे वेगळंच जग आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या