
सामना वार्ताहार । कन्नड
गौताळा अभयारण्यातील भांबरवाडी परिसरातील गायींच्या हल्ल्यात जखमी झालेला एक बिबट्या अखेर उपचारादरम्यान दगावला. सोमवार, ९ जुलै रोजी भांबरवाडी परिसरातील गट क्र. ४७ मध्ये बिबट्याने गोठ्यात घुसून वासरावर ताव मारला. या गोठ्यात अजून तीन गायी होत्या. वासराला मारल्यानंतर या बिबट्याने आपला मोर्चा या गायींकडे वळवला; परंतु त्या तिन्ही गायींनी प्रतिकार करीत बिबट्यावर प्रतिहल्ला केला. या हल्ल्यात बिबट्या गंभीर जखमी झाला. बिबट्या जखमी अवस्थेत भांबरवाडीजवळील एका नाल्यात असल्याची माहिती मिळताच सहायक वन्य जीवरक्षक रत्नाकर नागापूरकर हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देण्यात आले. त्याच्यावर प्राथमिक उपचार कन्नड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात करण्यात आले. नंतर संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात उपचार करण्यात आले. तद्नंतर जुन्नर (जि. पुणे) बिबट्या निवारा केंद्रात ठेवण्यात आले होते. गायींच्या प्रतिहल्ल्यात गंभीर जखमी होऊन बिबट्याच्या पाठीचा कणा मोडला होता. या काळात आजारी असल्याने उपासमार झाली. त्यामुळे त्याला अशक्तपणा आला होता. तसेच हा बिबट्या वयोवृद्ध होता. उपचारादरम्यान हा बिबट्या दगावला, अशी माहिती सहायक वन्यजीवरक्षक रत्नाकर नागापूरकर यांनी दिली.




























































