
नगर शहरातील शासकीय तंत्रनिकेतन व भवानीनगर परिसरात बिबट्या आढळून आला आहे. त्यामुळे वनविभागाच्या पथकाने परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
भवानीनगर परिसरातील काही नागरिक सोमवारी सायंकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी त्यातील एका युवकाला शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक कॉलेज) परिसरात बिबट्या दिसला. त्या युवकाने या बाबतची माहिती परिसरातील नागरिक व वनविभागाला दिली. त्यानुसार माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरू आहे. वनविभागाने भवानीनगर, ढोरवस्ती, डॉक्टर कॉलनी, बुरुडगाव रस्ता परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून कोणीही घराबाहेर पडू नये असे सांगितले आहे.






























































