साक्रीच्या इच्छापुरात धुमाकूळ, बिबट्याने शंभर मेंढ्यांचा गळा घोटला

824
leopard

ग्रामीण भागामध्ये बिबटय़ांची संख्या वाढत असून त्यांनी भक्ष शोधण्यासाठी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला आहे. अशाच एका बिबट्याने तब्बल शंभर मेंढ्यांचा गळा घोटून त्यांना ठार मारल्याची घटना साक्री तालुक्यातील इच्छापूर शिवारात घडली. या घटनेमुळे शिव मारनर या शेतकऱ्याचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असून मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

साक्री तालुक्यातील इच्छापूर शिवारात बिबटय़ाने मेढय़ांच्या वाडय़ावर हल्ला केला. इच्छापूर गावात राहणाऱया शिव मारनर यांनी माळरानावरून मेंढय़ा आणल्यानंतर रात्री कुंपण असलेल्या वाड्यात मेंढ्या कोंडल्या आणि ते घरी गेले. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी मारनर मेंढ्यांच्या वाडय़ावर आले तेव्हा त्यांना वाडय़ातील सर्व मेंढय़ा रक्ताच्या थारोळय़ात निपचित पडलेल्या दिसल्या. बिबटय़ाने एकामागोमाग एक अशा सुमारे शंभर मेंढ्यांच्या गळ्याचा घोट घेतला. मेंढ्यांवर हल्ला करणारे किमान दोन बिबटे असावेत असा अंदाज मेंढपाळांनी व्यक्त केला. बिबट्याच्या या कृत्यामुळे इच्छापूरसह परिसरातील मेंढपाळ चिंताग्रस्त झाले आहेत. सरासरी पाच हजार रुपये किमतीची एक मेंढी या हिशेबाने मारनर यांचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. मेंढ्यांचे पालनपोषण करूनच मारनर यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा चरितार्थ चालत असल्यामुळे वनविभागाने मारनर यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

बिबट्यांची संख्या वाढली
धुळे जिल्ह्यातील वनक्षेत्रात गेल्या काही वर्षांत बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. असे असले तरी संरक्षित क्षेत्रातील वन्य जीवांसाठी अन्नाचा पुरेसा बंदोबस्त होताना दिसत नाही. वन्य प्राण्यांची संख्या वाढलेली असताना त्यात बिबटय़ांची संख्या जास्त आहे.

आपली प्रतिक्रिया द्या