
सामना ऑनलाईन । रायबरेली
काँग्रेसचा बालेकिला समजल्या जाणार्या रायबरेलीत पंतप्रधान नरेंदी मोदी यांची सभा होती. परंतु या सभेचा फज्जा उडाला असून तिथे अपेक्षेहून कमी गर्दी जमली, त्यामुळे सभेच्या ठिकाणी अनेक खुर्च्या मोकळ्या असल्याचे चित्र होते. जेव्हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सभेत भाषण देत होते तेव्हा अनेक खुर्च्या मोकळ्या दिसत होत्या. कदाचित याच कारणामुळे तासाभराच्या उशिरानंतर पंतप्रधान मोदींच्या भाषणाला सुरूवार झाली. जेव्हा पंतप्रधान मोदी भाषण करत होते तेव्हा गर्दी होती असा दावा भाजप पदाधिकार्यांनी केला आहे. रायबरेली या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या माजी अध्यक्षा विद्यमान खासदार आहेत.
मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा पहिला रायबरेली दौरा होता. हा दौरा यशस्वी होण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी पदाधिकार्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. परंतु मोठी गर्दी जमवण्यात भाजप कार्यकर्त्यांना अपयश आले. सभेत भाषण करण्यापूर्वी मोदींनी मॉर्डन रेल्वे कोच फॅक्ट्रीला भेट दिली. तिथे बनवल्या गेलेल्या ९०० वी कोच आणी हमसफर कोचला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. तसेच अनेक विकासकामांचे भुमीपूजन आणि लोकार्पण केले.
पंतप्रधान मोदी यांनी रायबरेलीत घेतलेली सभा म्हणजेच भाजपकडून लोकसभेच्या निवडणूकीची तयारी समजली जाते. त्यामुळे राज्यातील भाजप नेत्यांनी या मोदींच्या सभेसाठी चांगलीच मेहनत घेतली होती. स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या दौर्याच्या आयोजनात जातीने लक्ष देत होते. भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह प्रशासनही या दौर्याच्या कामासाठी जुंपले होते. मोदींच्या उपस्थितीत जेव्हा योगी भाषण देत होते, तेव्हा समोर अनेक खुर्च्या मोकळ्या होते हे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. स्थानिक पत्रकार उपेंद्र सिंह याबाबत म्हणाले की, “सोनिया गांधी यांच्या सभेला जशी गर्दी जमते तशी गर्दी पंतप्रधान मोदी यांच्या सभेत दिसली नाही.”
या सभेत मोदींनी विरोधी पक्षांवर कडाडून टीका केली. मोदी म्हणाले की, “ सध्या देशात दोनच पक्ष आहेत. एक सरकारचा जो, सैन्याची ताकद वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तर दुसरा पक्ष जे कुठल्या किंमतीवर देशाला कमकुवत करत आहे. काँग्रेस पक्ष अशाच पक्षांसोबत आहे. अशा लोकांसाठी देशाचे संरक्षण मंत्रायल खोटे आहे, संरक्षण मंत्री खोट्या आहे, नौदलाचे अधिकारी खोटे आहे, फ्रान्सचे सरकार खोटे आहे आणि आता त्यांना सर्वोच्च न्यायालयही खोटे वाटायला लागले आहे. ”



























































