NCERT च्या पाठ्यपुस्तकात औरंगजेबाबद्दल आधारहीन माहिती?

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजेच NCERT च्या 12 च्या पुस्तकावरून पुन्हा वादंग निर्माण झाला आहे. इतिहासाच्या या पुस्तकामध्ये शाहजहान आणि औरंगजेबाने युद्धात मंदिरे उद्वस्त केल्यानंतर ती दुरुस्त करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता असा उल्लेख आहे. या गोष्टीला आधार काय ? असा प्रश्न एका व्यक्तीने माहितीच्या अधिकाराअंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला विचारला होता.

NCERTचं 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी इंडियन हिस्टरी (भाग-2) नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाच्या पान नंबर 234 वर दुसऱ्या परिच्छेदामध्ये शहाजहां आणि औरंगजेबाने युद्धकाळात उध्वस्त केलेल्या मंदिराच्या पुननिर्माणासाठी निधी दिला होता असा उल्लेख आहे. या विधानाला आधार काय असा? असा प्रश्न शिवांक शर्मा यांनी विचारला होता. हा प्रश्न विचारला असता त्यावर NCERT ने पुराव्यांसह उत्तर देण्याऐवजी विचारलेल्या प्रश्नाबाबत विभागाकडे कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं आहे. माहिती अधिकारात प्रश्न विचारणाऱ्या शिवांक शर्मा यांनी याच धड्यावरून आणखी एक प्रश्न विचारला होता की शहाजहान आणि औरंगजेबाने किती मंदिरे दुरुस्त केली होती. या प्रश्नाबाबतही NCERT ने आपल्या विभागाकडे कोणतीही माहिती नसल्याचं म्हटलं आहे. ही उत्तरे उजेडात आल्यानंतर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ.इंदू विश्वनाथन यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

18 नोव्हेंबर 2020 रोजी NCERT ने या प्रश्नांची उत्तरे दिली आहे. या लेटरहेडवर सही ही जनमाहिती अधिकारी गौरी श्रीवास्तव यांनी केलेली आहे. धक्कादायक बाब ही आहे की शिवांक शर्मा यांनी विचारलेल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे सारखीच असून त्यामुळे पुस्तकातील विधानांना नेमका आधार काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. या माहितीमुळे गुरुवारी ट्विटरवर मोगल हा शब्द ट्रेंड व्हायला लागला होता. ट्विटर वापरणाऱ्यांनी NCERT च्या या उत्तरानंतर आतापर्यंत पुस्तकांमध्ये कोणत्याही तथ्याच्या आधाराशिवाय किंवा मोगलांचे गुणगान करण्यासाठी इतिहास शिकवण्यात आला का ? असे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या