देश आणि राज्याला कोरोनामुक्त करू! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाला पराभूत करत आपल्याला कोरोनामुक्त व्हायचे आहे. आपण सर्वजण मिळून नक्कीच या संकटावर मात करू. मी माझा देश, राज्य कोरोनामुक्त करणारच आणि पुढील स्वातंत्र्यदिन कोरोनामुक्त वातावरणातच साजरा करणार असा सर्वजण मिळून निश्चय करूया. यासाठी संयम आणि शिस्तीचे पालन करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 75व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज मंत्रालय प्रांगणात राष्ट्रध्वजारोहण केले. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे याही उपस्थित होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व शहीदांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले,

छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीयांचे आक्रमण परतवून लावत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची बीजे रुजवली. राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील कुप्रथा, विषमता यांच्या बेडया तोडल्या. विषमतेविरुद्ध लढा उभारून स्वातंत्र्य, समता म्हणजे काय हे सांगितले, केवळ स्वातंत्र्याचा इतिहास डोळ्यांसमोर ठेवून स्वातंत्र्यदिन साजरा करण्याला महत्त्व नाही, हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. यात अनेकजण शहीद झाले. या सर्वांनी आपल्या समर्पणातून दिलेल्या स्वातंत्र्याची जपणूक करणे हे आपले कर्तव्य आहे. त्या स्वातंत्र्याचे मूल्य जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

‘वर्षा’ निवासस्थानी ध्वजारोहण

स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ‘वर्षा ’ निवासस्थानी ध्वजारोहण केले. सौ. रश्मी ठाकरे यांनीही राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी उपस्थित पोलीस पथक तसेच वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आदींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

…तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल

कोरोनामुळे एक नवीन पारतंत्र्य आपण मागच्या दीड वर्षापासून अनुभवत आहोत. ऑक्सिजनचे प्रमाण लक्षात घेऊन आपण निर्बंधात शिथिलता आणत आहोत. पण कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. परदेशात काही ठिकाणी ते नव्याने उसळले आहे. आपल्याकडे हे संकट नव्याने उसळू नये म्हणून काळजी घ्यायची आहे. आता साथ आटोक्यात असली तरी आपल्याला अजूनही संपूर्ण खबरदारी घ्यावी लागणार आहे. ऑक्सिजन क्षमता लक्षात घेतली आणि रुग्णसंख्या वाढू लागली तर नाइलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावे लागेल. त्यामुळे  कोरोना प्रतिबंधक नियमांचे यापुढेही कटाक्षाने पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

 

पदकविजेत्या पोलिसांच अभिनंदन

दिवंगत कोरोनावीरांना श्रद्धांजली

राज्यातील  राष्ट्रपती पदके मिळवलेल्या पोलिसांचा तसेच इतर पुरस्कार विजेत्यांचा नामोल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात त्यांचा गौरव आणि अभिनंदन केले. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी अनेक कोरोना योद्धय़ांनी दिवसरात्र संघर्ष केला. त्यापैकी अनेकांना कोरोनाची बाधा झाली. यात अनेकजण बरे झाले तर काही जणांना दुर्दैवाने प्राण गमवावे लागले. त्यांचे हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवंगत कोरोनावीरांना श्रद्धांजली वाहिली. ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या कोरोना योद्धय़ांची भेट घेतली, त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करत ते करत असलेल्या कामकाजाची माहिती घेतली.