रात्री वाया जातायत, मला बायको शोधून द्या! प्रशिक्षणाला दांडी मारण्यासाठी शिक्षकाची सरकारकडे मागणी

माझ्या रात्री वाया जात आहेत, आधी मला बायको द्या! अशी भन्नाट मागणी एका शिक्षकाने सरकारकडे केली आहे. मध्य प्रदेशातील सतना येथील सरकारी शाळेत हा शिक्षक शिकवतो. निवडणूक मतदान आणि मतमोजणीसाठीच्या प्रशिक्षणात शिक्षकांना सहभागी करून घेण्यात आले आहे. या शिक्षकाला यात सहभागी व्हायचे नव्हते म्हणून त्याने ही मागणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. या मागणीनंतर शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.

अखिलेश कुमार मिश्रा असे या 35 वर्षीय शिक्षकाचे नाव आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून सुमारे 450 किमी अंतरावर असलेल्या सतना जिल्ह्यातील अमरपाटनचे रहिवासी असलेले मिश्रा हे महुदर उच्च माध्यमिक विद्यालयात संस्कृतचे शिक्षक म्हणून काम करतात. मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार असून यासाठी 16-17 ऑक्टोबर रोजी निवडणूक प्रशिक्षण सत्र बोलावण्यात आले होते. या प्रशिक्षण सत्राला मिश्रा यांना हजर राहण्यास सांगूनही ते अनुपस्थित होते. यामुळे 27 ऑक्टोबर रोजी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. महत्त्वाच्या कामात निष्काळजीपणा केल्याबद्दल आपल्याला निलंबित का करू नये, याचे स्पष्टीकरण द्यावे असे या नोटीसमध्ये म्हटले होते. या नोटीसला मिश्रा यांनी 31 ऑक्टोबर रोजी उत्तर दिले होते.

मिश्रा हे अद्याप अविवाहीत असून त्यांनी पत्रात म्हटले आहे की, ‘माझे आतापर्यंतचे आयुष्य मी पत्नीशिवाय घालवले आहे. माझ्या रात्री वाया गेल्या आहेत, आधी माझं लग्न करा. होणाऱ्या बायकोकडून मला फ्लॅटसाठी हुंडा आणि कर्ज मंजूरीसाठी 3.5 लाख रुपयेही द्या असे मिश्रा यांनी कारणे दाखवा नोटीशीला उत्तर देताना म्हटले आहे. मिश्रा यांचे हे उत्तर पाहून सतनाचे जिल्हाधिकारी अनुराग वर्मा यांनी डोक्याला हात लावला. वर्मा यांनी मिश्रा यांना निलंबित करण्याचे आदेश दिले जे  2 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आले. मिश्रा यांची या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. मिश्रा फोन वापरत नाही असे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. मिश्रा  हे गेली काही वर्षे तणावाखाली असल्याचेही त्यांनी सांगितले.