
‘लेटर्स न स्पिरिट’ या प्रामुख्याने सुलेखन कलेला वाहून घेतलेल्या एका कलाप्रेमी ग्रुपचे सुलेखन चित्रांचे प्रदर्शन काळाघोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरी येथे 22 सप्टेंबरपर्यंत सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेत सुरू राहणार आहे. हे प्रदर्शन म्हणजे सर्व सुलेखन प्रेमींसाठी पर्वणी आहे. सुलेखनाच्या मूळ स्वरूपाला धक्का न लावता त्या कलेचे वेगवेगळे कलाविष्कार कसे विकसित करता येतील या उद्देशाने हा ग्रुप गेली दहा वर्षे काम करतोय.
प्रसिद्ध सुलेखनकार ‘पद्मश्री’ अच्युत पालव यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लेटर्स न स्पिरिट’ हा सुलेखन कलेला वेगळा आयाम देणारा कलासमूह 2015 साली मनीष कासोदेकर, नीलेश देशपांडे, विनय देशपांडे आणि शिरीष शिरसाट या चार मित्रांनी स्थापन केला. नीलेश जाधव, अशोक हिंगे, कुलदीप कारेगावकर अशी नामवंत चित्रकार मंडळी यात कार्यरत आहेत. प्रयोगशीलता हाच मूळ गाभा पकडून सुलेखनाचे वेगवेगळे प्रयोग या ग्रुपद्वारे करण्यात आले आहेत. साहित्य आणि सुलेखन यांची सांगड घालत नामवंत साहित्यिकांच्या कृती आकर्षक स्वरूपात नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या ग्रुपने केला असून त्यांच्या प्रयोगांना उत्तम प्रतिसाद रसिकांकडून मिळाला. आता या ग्रुपच्या 16 कलाकारांच्या सुलेखन चित्रकृतींचे प्रदर्शन सुरु असून या प्रदर्शनाला मुंबईकरांची गर्दी होत आहे.
16 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाला दिवसाला साधारण 500 ते 600 कलारसिक भेट देतात. अक्षरांचे विविध प्रकार एकाच प्रदर्शनात बघायला मिळाले, अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून येत असल्याचे मनीष कासोदेकर यांनी सांगितले.