
मोबाईल फोनच्या मार्केटमध्ये स्पर्धा वाढली आहे. मोबाईल उत्पादन करणाऱ्या कंपन्या एकापेक्षा एक भन्नाट स्मार्टफोन लॉन्च करुन एकमेकांना टक्कर देण्याचा प्रयत्न करत असतात. अशा परिस्थितीत एकेकाळी बऱ्यापैकी दबदबा असलेली एक कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
एलजी ही कोरिअन कंपनी असून एकेकाळी या कंपनीचा बोलबाला होता. मात्र गेले काही वर्ष एलजीही कंपनी स्मार्टफोन उद्योगामध्ये मागे पडली आहे. अन्य कंपनींच्या स्पर्धेत तग धरण्यासाठी या कंपनीने वेगवेगळे स्मार्टफोन लॉन्च केले खरे मात्र हे मोबाईल कोणी विकतच घेत नाहीयेत. स्मार्टफोन क्षेत्रात या कंपनीचा बाजार हिस्सा अवघ्या एक टक्क्यांवर आला आहे. ग्राहकच नसल्याने कंपनीपुढे गाशा गुंडाळण्यापलिकडे दुसरा कुठला पर्याय राहिलेला नाही. याबाबत कंपनीने अधिकृत घोषणा जरी केली नसली तरी मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या महिन्यात एलजी कंपनी मोबाईल बिझनेस बंद करण्यासाठी घोषणा करु शकते. एलजी कंपनीने जर्मनीची कंपनी फोक्सवॅगन आणि वियतनामची कंपनी वीन समुहासोबत मोबाईल बिझनेस विकण्याबाबत चर्चा सुरु होती, मात्र तिही अपयशी ठरली.
ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार एलजी इलेक्ट्रॉनिक्सचे सीईओ यांनी सांगितले होते की कंपनीचा मोबाईल बिझनेसमध्ये तोटा सहन कराना लागत आहे. गेल्या महिन्यापासून कंपनीने मोबाईल अपग्रेडेशन करणं बंद केलं आहे. नुकतेच कंपनीने एलजीचा रोलोबल डिस्प्ले स्मार्टफोन आणला होता. हा मोबाईल बाजारात आणणार की नाही याबाबत अजून काही सांगण्यात आलेले नाही.


























































