रेल्वे पोलीस ठाण्यांमध्ये आता पुस्तक पेढी, नवीन वर्षात रेल्वे पोलिसांचा संकल्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगेश सौंदाळकर

दैनंदिन कामकाजातून मिळणारा वेळ मोबाईलवर वाया न घालवता तो सत्कारणी लागावा. जुने संदर्भ, इतिहासातील नोंदी, चालू घडामोडींची माहिती लक्षात राहाव्यात आणि वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी रेल्वे पोलीस ठाण्यांमध्ये पुस्तक पेढी सुरू करण्यात येणार आहे. लवकरच 17 रेल्वे पोलीस ठाण्यांमध्ये ही पुस्तक पेढी सुरू होईल.

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मिळून एकूण 17 रेल्वे पोलीस ठाणे असून 3 हजार 700 (अधिकारी ते पोलीस शिपाई) कार्यरत आहेत. चोरटय़ांच्या मुसक्या आवळणे, दैनंदिन गस्त ते जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेण्याचे काम रेल्वे पोलीस करतात. कामामुळे पोलिसांना पुस्तके वाचायला वेळ मिळत नाही. नुकतीच रेल्वे पोलिसांना आठ तास डय़ुटी सुरू झाली आहे. त्याला प्रतिसाद चांगला मिळत आहे. डय़ुटीदरम्यान जो वेळ मिळतो त्या वेळात जुनी संदर्भ असलेली पुस्तके, मासिके, प्रवास वर्णन, आत्मचरित्र, गुन्ह्याशी निगडित असलेल्या मासिकांमध्ये सविस्तर तपशील असतो. पोलीस एकदा गुन्हा कसा उघड करतात, सायबर गुन्हे कसे रोखता येईल याची सविस्तर माहिती असते. त्याचा भविष्यात फायदा होईल या हेतूने रेल्वे पोलीस ठाण्यांत पुस्तक पेढी सुरू करण्याचे ठरले आहे. पुस्तक पेढीकरिता जागा निवडण्याच्या सूचना अधिकाऱयांना देण्यात आल्या आहेत. लवकरच काही पुस्तके खरेदी करण्यात येणार आहेत. पहिल्यांदाच अशा प्रकारची पुस्तक पेढी रेल्वे पोलीस ठाण्यांमध्ये सुरू करण्यात येत आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पोलीस त्या पुस्तक पेढीतून पुस्तक घेऊन ती वाचतील. वाचनाची आवड निर्माण झाल्यास त्याचा फायदा पोलिसांना होईल.

‘टी विथ सीपी’
पोलिसांशी मनमोकळा संवाद साधता यावा या हेतूने ‘टी विथ सीपी’ हा उपक्रम आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी सुरू केला आहे. दर आठवडय़ाला 100 पोलिसांना बोलावले जाते. त्यांना योगा, आहार, युनिफॉर्म कसा असावा, नागरिकांशी कसे बोलावे, नवीन उपक्रम काय असावे, काम करताना डोळे उघडे ठेवा, कुटुंबाला वेळ द्या यावर संवाद साधला जातो.

पोलीस ठाण्यांमध्ये लवकरच पुस्तक पेढी सुरू केली जाईल. आत्मचरित्र वाचल्याने अडचणींवर मात करता येते. वाचनामुळे सकारात्मकता वाढेल.
– रवींद्र सेनगावकर, आयुक्त, लोहमार्ग रेल्वे