लिबियामध्ये हाहाकार! अणुबॉम्बसारखं फुटलं धरण, 40 हजार लोकांच्या मृत्युची भीती

उत्तर आफ्रिकेलीतील लीबिया या देशात सध्या पुरामुळे हाहा:कार माजला असून आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. लिबियातील डेरना शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे 40 हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तेथील अनेक घरे पाणी आणि चिखलाने भरल्यामुळे माती आणि ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढणे कठीण झाले आहे.

1.25 लाख लोकसंख्या असलेले डेरना शहर आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. तुटलेल्या इमारती, माती, एकमेकांवर आदळलेल्या गाड्या आजूबाजूला दिसत आहेत. या चिखलात मृतदेह असण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. पुरामुळे हजारो नागरिक बेपत्ता झाले असावेत असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

युगोस्लाव्हियन कंपनीने 1970 मध्ये डेरना येथे दोन धरणे बांधली होती. पहिले धरण 75 मीटर उंच होते. दुसरे धरण 45 मीटर उंच होते. दोन्ही धरणांमध्ये सुमारे 2 कोटी क्यूसेक पाणीसाठा होता. दोन्ही धरणांचं बांधकाम काँक्रिटने करण्यात आलं होतं. अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी या धरणाला एक छिद्रही करण्यात आलं होतं. परंतु धरणाच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळे तेथे कचरा साचत राहिला. त्यामुळे वादळानंतर झालेल्या पावसामुळे धरण वेगाने भरू लागले. डॅनियल चक्रीवादळामुळे आठवडाभर पाऊस पडत होता. त्यामुळे या शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली. याबाबतचा अहवालही गेल्या वर्षी प्रसिद्ध करण्यात आला होता. डेरना धरणाचे काम तातडीने हाताळण्याची गरज असल्याचे त्या अहवालात म्हटले होते. अन्यथा येथे कधीही मोठा अनर्थ घडेल. परंतु प्रशासन आणि सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे.

लिबियातील शासनाने दिलेल्या माहितीनुसार ज्या भागांमध्ये पुरामुळे नुकसान झालं आहे त्यामध्ये मार्ज, सुसा आणि शाहट या शहांचा समावेश आहे. इथं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, पूरग्रस्तांना पूर्व लिबिया आणि बेनगाजी येथे स्थलांतरित करण्यात आलं आहे. इथं शाळा आणि इतर शासकीय इमारतींमध्ये त्यांच्या वास्तव्याची तात्पुरती सोय करण्यात आली आहे.