
सामना प्रतिनिधी, मुंबई
दारू पिऊन वाहन चालविल्यास वाहनचालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स 6 महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय राज्य रस्ता सुरक्षा परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री व रस्ता सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली. या निर्णयामुळे तळीरामांची झिंग एका फटक्यात उतरणार आहे.
सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या बैठकीला दिवाकर रावते यांच्यासह गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. अनुप यादव, सचिव (रस्ते) सी. पी. जोशी, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) विनय कोरगावकर, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) अमितेशकुमार आदी अधिकारी उपस्थित होते.
12 हजार चालकांवर कारवाई
अनेक अपघात हे वाहनचालकांनी दारूच्या नशेत वाहने चालविल्याने होत असल्याचे विविध अहवालांतून निष्पन्न झाले आहे. हे रोखण्यासाठी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांमार्फत सध्या मोठय़ा प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. मागील 2 महिन्यांत राज्यात 12 हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातील बहुतांश कारवाया या दारू पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी आहेत. आता अशा दारू पिऊन वाहन चालविणाऱया वाहनचालकांना जरब बसविण्यासाठी त्यांचा परवाना 6 महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे दिवाकर रावते यांनी सांगितले.
बेरोजगारांना काम
ज्या वाहनाचा विमा नजीकच्या काळात संपणार आहे त्यांना पत्राद्वारे तशी सूचना पाठविणारी यंत्रणा निर्माण करण्यात यावी. राज्यातील बेरोजगार तरुण, बचतगट आदींना हे काम देण्यात यावे. यासाठी होणारा खर्च वाहनधारकांकडून घेता येईल अशी सूचना रावते यांनी दिली.
विमा नसेल तर वाहन जप्त
विमा न उतरवलेले किंवा विम्याची मुदत संपलेले वाहन रस्त्यावर उतरवल्यास आणि दुर्दैवाने अशा वाहनाचा अपघात झाल्यास जखमी किंवा मृतास कोणत्याही प्रकारच्या विम्याचे लाभ मिळत नाहीत. सध्या अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते. पण आता यापुढे अशा वाहनांवर जागेवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित वाहन ताब्यात घेतले जाईल. वाहनधारकाने विमा घेऊन आल्यानंतर आणि अधिकृत दंड भरल्यानंतरच वाहन परत देण्यात येईल, असे दिवाकर रावते यांनी सांगितले.































































