
मुंबईत परवानाधारकांना वाईन शॉपमधून दारूची होम डिलिव्हरी घेता येणार आहे. कोरोना खबरदारीचे नियम पाळून सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत दारू मागवता येणार आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी याबाबत परिपत्रक जारी केले आहे. वाईन शॉपवर दारू विक्री करता येणार नाही, असेही यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोना रुग्णवाढ होत असतानाही वाईनशॉपवर होणाऱया गर्दीमुळे रुग्णवाढीचा धोका वाढत असल्याने पालिकेने केवळ घरपोच दारू पुरवठा करण्यास परवानगी दिली आहे. राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’बाबतचे आदेश अस्तित्वात असेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहे. हे नियम मोडल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे.
यासाठी संबंधित व्यक्तीकडे मद्य साठवणीचे किंवा पिण्याचा परवाना असणे बंधनकारक आहे. आठवडय़ातील सर्व दिवशी सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत ही मद्य घरपोच देता येणार आहे. मद्य घरी पोहचविणाऱया व्यक्तींने वैयक्तीक स्वच्छता आणि कोविड संबंधीचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. दरम्यान, राज्य सरकारने शुक्रवारी काढलेल्या परिपत्रकानुसार बारमधून सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत दारूची होम डिलिव्हरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.






























































