
सिक्कीममध्ये गस्त घालताना सहकारी नदीत पडला आणि पाण्याच्या प्रवाहासोबत वाहू लागला. हे पाहून 23 वर्षीय लेफ्टनंट शशांक तिवारी यांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेतली. पाण्याच्या वेगवान प्रवाहात प्रयत्नांची पराकाष्टा करत त्यांनी सहकाऱ्याचा जीव वाचवला. मात्र तिवारी स्वतःचा बचाव करु शकले नाही आणि त्यांना वीरमरण आले. शशांक तिवारी हे मूळचे उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील रहिवासी आहेत.
शशांक तिवारी यांचे वडील मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी असून सध्या अमेरिकेत कर्तव्यावर आहेत. ते शुक्रवारी रात्री उशिरा देशात पोहचतील. यामुळे शनिवारी शासकीय इतमामात जमथरा घाटावर शशांकचे अंत्यसंस्कार करण्यात येतील. 2019 मध्ये शशांकचे एनडीएत निवड झाली. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये ते सेवेत रुजू झाले. गेल्या वर्षी त्यांना कमिशन मिळाले आणि त्यांची पहिली पोस्टिंग सिक्कीममध्ये झाली.

























































