अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या पतीचा खून, प्रियकर आरोपीस जन्मठेप, दंडाची शिक्षा, पुराव्याअभावी पत्नीची निर्दोष मुक्तता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनैतिक संबंधाला विरोध करतो या कारणावरून विकास इंद्रभान पवार याला लाकडी दांडक्यांनी डोक्यावर, हातावर गंभीर मारहाण करून खुन करणाऱ्या प्रियकर विशाल प्रदीप तोरणे (रा. पढेगाव) याला अति. जिल्हा सत्र न्यायाधीश महमंद नासीर एम. सलीम यांनी जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली, तर सबळ पुराव्याअभावी पत्नी मनिषा पवार हिची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

याबाबत हकिकत अशी, पढेगाव येथील विशाल तोरणे याच्याकडे विकास पवार आणि मनिषा हे पती-पत्नी शेतामध्ये कामाला होते. त्यावेळी मनिषा हिचे विशाल तोरणे याच्याशी प्रेमसंबंध जुळले. या संबंधांमुळे पती-पत्नींमध्ये भांडणे होत. विशाल तोरणे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असुन त्याच्याविरुध्द चोरी, मारामारीचे गुन्हे नगर जिल्हयात दाखल आहेत. त्याला घाबरून हे कुटुंब देवगावला निघुन गेले. पत्नी माहेरी वडिलांकडे गेली.

5 एप्रिल 2018 रोजी रात्री शकुबाबाच्या यात्रेकरिता विकास पढेगाव येथे एकटाच गेला. तेव्हा पत्नी मनिषाही विशाल बरोबर होती. त्यावेळेस विशाल आणि विकास या दोघांमध्ये भांडणे झाली. विशालने विकासला लाकडी दांडयांनी मारहाण केली. या मारहाणीत विकास मरण पावला. याबाबत पोलिसांनी विशाल प्रदीप तोरणे व मनिषा विकास पवार या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक वसंत महादू पथवे यांनी केला. सदर गुन्ह्यामध्ये मयताचे व आरोपींचे कपडे तसेच ज्या लाकडाने मारहाण झाली ती लाकडे जप्त करून नाशिक येथील न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणीकरता पाठविण्यात आली. सरकारी पक्षातर्फे 13 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. यामध्ये घटनास्थळ पंच, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तपास अधिकारी, फोटोग्राफर, डॉक्टर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. मृत विकास हा आरोपीस मारण्यास गेला होता व स्वसंरक्षणार्थ आरोपीने हे कृत्य केलेले आहे, असा युक्तीवाद आरोपीच्या वकिलांनी केला मात्र हा बचाव न्यायालयाने ग्राह्य धरला नाही. आरोपीने जाणीवपूर्वक मारहाण करून खून केला आहे, ही बाब न्यायालयाने ग्राह्य धरली व आरोपीस विशाल प्रदीप तोरणे यास जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली.

तसेच मयत विकास याची पत्नी मनिषा हिच्याविरोधात कुठलाही साक्षीपुरावा नसल्याने तिची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे अॅड. प्रसन्न प्रभाकर गटणे यांनी बाजु मांडली.