सासूचा खून करणाऱ्या जावयाला जन्मठेपेची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बायकोला नांदायला का पाठवत नाही असे विचारायला गेलेल्या आरोपीने सासूची 14 जून 2018 निर्घूण हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपी सिंध्देश्वर रामराव चव्हाण याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन न्यायालयात आरोपपत्र सादर केले व आरोपीस दोषी ठरवत जन्मठेप व 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 14 जून 2018 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास तक्रारदार रोहित, व त्याचे कुटुंब तसेच आरोपी सिध्देश्वर याची पत्नी वैशाली हे (माळेगाव ता. मंठा) येथे स्वतःच्या घरी होते. त्यावेळेस  आरोपी सिध्देश्वर तिथे गेला व 2 महिन्यापासून माझी पत्नी तुमच्याकडे राहते तिला नांदवयास का पाठवत नाही, अशी विचारणा केली. त्यावेळी तक्रारदार रोहित म्हणाला की, तू दारु पिवून बहिणीस मारहाण व शिवीागाळ करतो म्हणून आज आम्ही तिला पाठवत नाही. त्यानंतर आरोपीने रोहितशी धक्काबुक्की करून तेथून निघून गेला. त्यानंतर रोहित याने गावातील सेवकराम श्रीराम राठोड यांना बोलावून घेतले व पोलीस ठाण्यात फोन करण्यास सांगितले. त्याचवेळी 7 च्या सुमारास आरोपी सिध्देश्वर हा हातात चाकू घेवून आला व शिवीगाळ करुन माझ्या पत्नीस माझ्यासोबत का पाठवित नाहीत. एका एकाला बघतो, अशी धमकी देत सासू सुमनबाई हिच्या छातीवर चाकूने वार केला व आरोपीची पत्नी आणि रोहीत हे मध्यस्तीसाठी आले असता त्या दोघांना देखील चाकूचा मार लागला. त्यानंतर लगेचच रोहीतने व नातेवाईकांनी सुमनबाई यांना मंठा दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 रोहित श्रीराम राठोड यांनी मंठा पोलीस ठाण्यात तक्रार करताच पोलिसांनी आरोपी सिंध्देश्वर रामराव चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपीविरुध्द न्यायालयात आरोपपत्र सादर केले. या खटल्यात एकूण 6 साक्षीदारांची साक्ष  नोंदवली. त्यामध्ये रोहित तसेच नितीन चिंचोले हे घटनास्थळीचे व चाकू जप्तीचे साक्षीदार असून आरोपीची पत्नी वैशाली व सेवकराम व तपासीक अधिकारी आर.एन. शेख, पोलीस निरीक्षक यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. न्यायाधीश एस.जि. वेदपाठक यांनी आरोपीस दोषी ठरवून  जन्मठेप व 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 3 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली.या प्रकरणामधील जिल्हा व सत्र न्यायाधीश जालना यांच्या समोर या प्रकरणावरुन अशोक देविदासराव मते, सहायक सरकारी वकील तथा अभियोक्ता,जालना यांनी युक्तीवाद केला.