तरुणीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या चौघांना जन्मठेप

443

संभाजीनगरमध्ये मित्रांसोबत बोलत असलेल्या 22 वर्षीय तरूणीला मारहाण करून सामूहिक अत्याचार करणाऱ्या चौघांना जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. एस. भिष्मा यांनी जन्मठेप आणि प्रत्येकी 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

एसटीच्या विभागीय कार्यालयातील 22वर्षांची तरूणी 27 ऑगस्ट 2015 रोजी मित्राला भेटण्यासाठी जालना रस्त्यावरील केंब्रीज शाळेजवळ रात्री आठ वाजेच्या सुमारास गेली होती. रस्त्याच्या बाजूला मित्रांसोबत गप्पा मारत असतान दुचाकीवरून चारजण आले. त्यांनी त्या दोघांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांनी तरुणीला रस्त्यालगत असलेल्या शेतात नेले आणि तिच्यावर अत्याचार केले. त्या चौघांपासून तिच्या मित्राने सुटका करून घेतली आणि तो जालना रस्त्यावर आला. त्याला गस्तीवर असलेली पोलीस व्हॅन दिसली. त्याने पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस येत असल्याचे पाहून त्या चौघांनी पोबरा केला. एमआयडीसी सिडको पोलिसांनी पीडितेला उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविले. घटना चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे संबधित अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली.

पीडित तरूणीच्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या विशेष पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी गुन्ह्याचा तपास करुन शेख तय्यब शेख बाबुलाल, कालेम आली शौकत आली, शेख जमील शेख हुसेन बागवान आणि शेख अश्पाक शेख हुसेन या चौघांना अटक केली. पोलिसांनी तपास करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या खटल्याची अंतिम सुनावणी विशेष न्यायालयासमोर झाली असता सहायक लोकअभियुक्त सुदेश शिरसाठ यांनी 14 साक्षीदार तपासले. पीडिता, वैद्यकीय अधिकारी, पीडितेचा मित्र यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयाने त्या चौघांना दोषी ठरवून जन्मठेप आणि प्रत्येकी 50 हजार रूपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी तीन वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावली. नुकसान भरपाईपोटी एक लाख रूपये पीडिताला देण्यात यावे असे आदेशात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या