
नारळपाण्यात अनेक पोषत तत्त्वे असल्यामुळे ते निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. शारीरिक ताकद वाढण्यासाठी आणि शरीरातील उष्णता बाहेर पडण्यासाठी नारळपाणी पिणे गुणकारी मानले जाते. यामध्ये कॅलरी कमी प्रमाणात असतात तसेच नैसर्गिक एंजाइम्स आणि पोटॅशियम, मिनरल्स याचाही समावेश असतो. तुम्हाला माहित आहे का की, ‘नारळपाणी’ पिण्याची योग्य वेळ कोणती ? कोणत्या वेळेत ते प्यायल्याने शरीराला जास्त प्रमाणात फायदा होतो. पाहूया दिवसभरात कोणत्या वेळी नारळपाणी प्यावे आणि त्याचे काय फायदे आहेत याविषयी.
नारळपाणी पिण्याची योग्य वेळ
नारळपाण्याचे सेवन दिवसभरात कधीही करता येऊ शकते. दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी नारळपाणी पिऊ शकता, मात्र विशिष्ट वेळी नारळपाणी प्यायल्यामुळे त्याचा शारीरिक आरोग्याकरिता जास्त प्रमाणात फायदा होतो.
रिकाम्या पोटी नारळपाण्याचे सेवन
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी नारळपाणी प्यायल्याने शरीराला दुप्पट फायदा होतो. नारळ पाण्यात लॉरिक अॅसिड असते ज्यामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढायला मदत होते. याशिवाय मेटाबॉलिज्मही वाढतो. वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर सकाळी रिकाम्यापोटी नारळपाणी प्यावे. गर्भवती महिलांसाठी नारळपाणी पिणे गुणकारी ठरते. यामुळे डिहायड्रेशन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका व्हायला मदत होते. याशिवाय गरोदरपणात होणारे त्रास दूर करण्यासाठी नारळपाणी पिण्याचा फायदा होतो. मॉर्निंग सिकनेस आणि हार्टबर्न यासारख्या समस्यांवर नारळपाणी गुणकारी आहे.
व्यायाम करण्यापूर्वी आणि केल्यानंतर
नारळपाणी हे सर्वोत्तम नैसर्गिक पेय आहे. हे शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. व्यायामापूर्वी आणि व्यायाम केल्यानंतर ऊर्जा वाढावी यासाठी हे पेय प्यावे. व्यायामामुळे आलेला थकवा कमी करण्यासाठी नारळपाण्याचा उपयोग होतो.
जेवण्यापूर्वी नारळपाणी प्या
जेवण्यापूर्वी नारळपाणी प्यायल्यास ओवरईटिंगच्या समस्येपासून सुटका होते. नारळपाण्याचे सेवन केल्याने पचनशक्ती सुधारायला मदत होते. याशिवाय जेवणानंतर होणारी ब्लोटींगची समस्या टाळण्यासाठी हे पेय प्यावे तसेच नारळपाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहायला मदत होते यामुळे पचनशक्ती सुधारते.
रात्री झोपण्यापूर्वी
नारळपाण्याच्या सुगंधामुळे आपले डोके शांत राहायला मदत होऊन आराम मिळतो. विशेष म्हणजे यामुळे तणाव कमी होतो आणि मन शांत राहते. रात्री झोपतेवेळी नारळपाणी प्यायल्यास विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. यामुळे युरिनरी ट्रॅक इंन्फेक्शन आणि किडनीशी निगडीत आजार बरे व्हायला मदत होते.
हँगओव्हरवर फायदेशीर उपाय
हॅंगओव्हरपासून रक्षण व्हावे, असे वाटत असेल तर नारळपाणी आपल्यासाठी खूपच गुणकारी ठरू शकते. दारूचे सेवन केल्याने शरीरात डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते. यामुळे सकाळी उठल्यानंतर डोकेदुखीचा सामना करावा लागतो. नारळपाण्यामुळे इलेक्ट्रोलाइट्स रिस्टोर व्हायला मदत होते.






























































