
कोणत्याही ऋतुच्या तुलनेत पावसाळ्यात आरोग्याची काळजी जास्त घ्यावी लागते. कारण या दिवसांत थंड वातावरणामुळे सर्दी, कफ आणि तापाचे आजार बळावतात. आपल्याकडे सणासुदीला साळीच्या लाह्या आणि बत्तासे यांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. हा प्रसाद घरात सगळ्यांना दिला जातो. साळीच्या लाह्या आणि बत्तासे फक्त धार्मिक कार्याकरिताच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहेत. घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहावे याकरिताच साळीच्या लाह्या आणि बत्ताशांचा प्रसाद दिला जातो. पावसाळ्यातील आजारांवर साळीच्या लाह्यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. पाहूया याचे काय फायदे आहेत.
– साळीच्या लाह्या खाल्ल्यास कफ कमी होण्यास मदत होते. लहान मुलांना साळीच्या लाह्या देऊ शकता. हा हलका आहार असून पावसाळ्यात मुले आणि मोठ्यांनी साळीच्या लाह्यांचा समावेश करावा.
– वजन कमी करण्यासाठी साळीच्या लाह्या उपयुक्त आहेत. लाह्यांमुळे भूक कमी लागते. जेवण कमी जाते. कमी जेवले तरी लाह्या खाल्ल्यामुळे थकवा जाणवत नाही. सकाळी नाश्त्यावेळीही आहात दूध लाह्या यांचा समावेश करू शकता.
– हल्ली अनेक जणांना एसिडीटीचा त्रास होतो. तेलकट व मसालेदार पदार्थ, जागरण, भूक नसताना खाणे अशी अनेक कारणे यामागे असतात. अशावेळी साळीच्या लाह्या खाव्यात. अॅसिडिटी कमी होण्यास मदत होते.
– पचनाच्या तक्रारी असतील, तर साळीच्या लाह्या जरूर खा. साळीच्या लाह्या पचायला हलक्या असतात. पचनसंस्थेसाठी आणि पचनक्रियेसाठी या लाह्या उपयुक्त आहेत.
– कंबरदुखी, पोटदुखी, अंगदुखी, अशा प्रकारचे आजार महिलांमध्ये जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे त्यांनी आपल्या आहारात नियमित साळीच्या लाह्यांचा समावेश करावा. त्यामुळे अंगदुखीचा त्रास कमी व्हायला मदत होऊ शकते.
– लाह्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स असते. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते, त्वचेचे सौंदर्यही वाढते. लाह्यांची पावडरही बाजारात मिळते. ही पावडर दुधात मिसळून त्वचेवर लावावी. हा एक नैसर्गिक फेसपॅक आहे. त्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स, वांगाचे डाग, त्वचेचा निस्तेजपणा कमी होतो.



























































