दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीचे दिल्ली, पंजाबसह हैदराबादमधील 35 जागांवर छापे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली येथील दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने शुक्रवारी दिल्ली, हैदराबादसह आणि पंजाबमध्ये 35 जागांवर छापेमारी केली आहे. या आधी सप्टेंबर महिन्यात देखील ईडीने छापेमारी केली होती. आतापर्यंत या प्रकरणात दोन आरोपींना अटक झाली आहे.

ईडीच्या या छापेमारीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. फक्त गलिच्छ राजकारण करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या वेळेचा अपव्यय केला जात आहे. त्यांनी ट्वीट करत असं म्हटलं आहे की, 500हून अधिक छापे, तीन महिन्यांपासून ईडी-सीबीआयच्या 300हून अधिकाऱ्यांना कामाला लावण्यात आलं आहे, फक्त मनिष सिसोदियाविरुद्ध पुरावे शोधण्यासाठी. काही मिळतच नाहीये, कारण काही केलेलंच नाहीये. आपलं घाणेरडं राजकारण करण्यासाठी इतक्या अधिकाऱ्यांचा वेळ फुकट घालवण्यात आला तर देशाची प्रगती कशी होईल? असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

याआधी 28 सप्टेंबर रोजी ईडीने समीर महेंद्रू याला अटक केली होती. इंडोस्पिरीट्सचा मालक समीरमार्फत सिसोदिया यांच्या निकटवर्तीयांना कोट्यवधींची रक्कम दोन टप्प्यात देण्यात आली होती, असा आरोप ईडीने केला होता. हे निकटवर्तीय अबकारी धोरण बनवणे आणि अंमलबजावणी करण्यातील अफरातफरीत सहभागी असलेल्यांपैकी एक होते, असाही आरोपी ईडने केला होता.

यापूर्वी 16 सप्टेंबर रोजी 40 ठिकाणी छापेमारी केली होती. यात फक्त हैदराबादमध्ये 25 जागांवर छापेमारी करण्यात आली होती. याखेरीज मद्यधोरण घोटाळ्यात दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांचीही चौकशी करण्यात आली होती.