
तपोवनातील अठराशेहून अधिक झाडे तोडण्याचा सरकारचा डाव हाणून पाडण्यासाठी नाशिककरांनी आंदोलनाचा वणवा पेटवला आहे. त्याला सर्व स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. ज्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी हा संघर्ष सुरू आहे, ते चिमुकलेदेखील बुधवारी ‘तपोवन वाचवा’ मोहिमेत सहभागी झाले. झाडांना आलिंगन देत ‘झाडे जगवा’ अशी हाक त्यांनी सरकारला दिली. झाडांशिवाय परिस्थिती भयावह होईल, याची जाणीवही करून दिली.
कुंभमेळय़ानिमित्त साधुग्राम उभारण्यासाठी शेकडो झाडे तोडण्याच्या महापालिकेच्या भूमिकेमुळे संताप व्यक्त करीत नाशिककरांनी ‘तपोवन वाचवा’ चळवळ उभी केली आहे. त्यात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभाग घेतला. झाडे तोडून या जागेत ‘माईस’ हे एक्झिबिशन, मीटिंग सेंटर उभारण्याचा सरकारचा डाव आहे. हे सेंटर दुसरीकडे हलवा, एकाही झाडाला हात लावू नका, या मागणीसाठी नाशिककरांचा तपोवनात पहारा सुरू आहे. बुधवारी या आंदोलनात लर्नर्स पॅराडाईज स्कूलची मुले सहभागी झाली. ‘झाडे जगवा, भविष्य वाचवा’, असा संदेश त्यांनी दिला. झाडांना आलिंगन देत त्यांनी सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला.
झाडे नसतील तर उद्याचे आयुष्य कठीण राहील, हे सांगण्यासाठी एका चिमुकल्याने प्रतीकात्मक ऑक्सिजन मास्क लावला होता. दप्तरांतून रोपटी आणून ‘आम्ही झाडे तोडू देणार नाही’, अशी भूमिका घेतली. पर्यावरण रक्षणाचे महत्त्व सांगणारे फलक त्यांच्या हाती होते. शासनाने लहानग्यांची ही हाक ऐकून आपला अट्टाहास सोडावा, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. या वेळी भाकपचे राज्य सहसचिव राजू देसले, रोहन देशपांडे यांच्यासह पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.
जॉगिंग ट्रॅकवर सह्यांची मोहीम
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात नाशिककरांनी आंदोलन तीक्र केले आहे. याचाच एक भाग म्हणून नाशिक रोडच्या शिखरेवाडी जॉगिंग ट्रॅकवर स्वाक्षरी मोहीम राबविली जात आहे. विकास करण्यासाठी झाडांवर कुऱहाड चालवायची हा कुठला नियम आहे? असा संताप व्यक्त करीत स्वाक्षरी मोहिमेला हजारो नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.





























































