राज्यातील चिमुकल्या न्यायासाठी टाहो फोडत असताना राज्यकर्त्यांनी स्वत:वर फुले उधळून घेतली; कृषी महोत्सवाच्या नावाखाली कोडगेपणाचे प्रदर्शन

राज्यातील चिमुकल्या न्यायासाठी टाहो फोडत असताना परळीत कृषी महोत्सवाच्या नावाखाली राज्यकर्त्यांनी कोडगेपणाचे हिडीस प्रदर्शन केले. निर्लज्जपणाचा कळस एवढा की, या राज्यकर्त्यांनी स्वत:वर फुले उधळून घेतली!

परळीत सरकारी खर्चाने कृषिमंत्र्यांच्या उदात्तीकरणाचा घाट घालण्यात आला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींची उपस्थिती होती. कृषी महोत्सवाचे उद्घाटन होण्याच्या पूर्वसंध्येलाच बदलापुरात दोन चिमुकल्यांवर अत्याचार करणार्‍या नराधमाला फाशी देण्याच्या मागणीसाठी आबालवृद्ध रस्त्यावर उतरले होते. न्याय मागणार्‍या या जनतेवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. गेल्या 48 तासांत महिलांवरील अत्याचाराच्या घटना राज्यात घडल्या.

चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटनेने उभा महाराष्ट्र संतप्त झालेला असताना परळीत मात्र सत्ताधारी राज्यकर्ते स्वत:वर फुले उधळून घेण्यात रममाण झाले होते. कृषी महोत्सवासाठी आलेल्या नेत्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीच्या दणदणाटात चिमुकल्यांच्या किंकाळ्या विरून गेल्या. या मिरवणुकीत फुलांची मुक्त उधळण करण्यात आली. व्यासपीठावरील नेत्यांमध्ये एकमेकांचे कौतुक करण्याची शर्यतच लागली होती.