मध्यमवर्गाला खूशखबर… कर्ज स्वस्त; आता घरासह गाडीही घ्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई/नवी दिल्ली

रिझर्व्ह बँकेने पतधोरण आढावा जाहीर करताना कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे. रेपोरेटमध्ये 0.25 टक्के कपात केली आहे. यामुळे गृहकर्ज, वाहनकर्ज आणि इतर लोनवरील व्याजदर कमी होणार आहेत. रिझर्व्ह बँकेने सलग तिसऱयांदा रेपोरेटमध्ये कपात केली. नवीन दरानुसार रेपोरेट 5.75 टक्क्यांवर आला आहे. नऊ वर्षातील हा नीचांकी रेपोरेट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱया कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प 5 जुलै रोजी सादर होणार आहे. तत्पूर्वी आज चालू आर्थिक वर्षातील दुसरे पतधोरण सादर करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपोरेट कपात करून जनतेला गिफ्ट दिले आहे.

सलग तिसऱयांदा कपात
रिझर्व्ह बँकेने यापूर्वीच्या दोन पतधोरणात रेपोरेटमध्ये 0.25 टक्के कपात झाली होती. आज पुन्हा रेपोरेटमध्ये 0.25 टक्के कपात केली. रेपोरेट 5.75 टक्के झाला आहे. सलग तीनवेळा रेपोरेटमध्ये कपात होण्याची रिझर्व्ह बँकेच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे.

काय परिणाम होणार?
n रिझर्व्ह बँकेकडून देशभरातील बँका ज्या दराने निधी दिला जातो त्याला रेपोरेट म्हणतात. बँकांना कमी दराने निधी मिळाल्यास त्याचा फायदा थेट ग्राहकांना होतो.
n रेपोरेट कपातीचा फायदा कर्जदारांना द्या अशी सूचना ‘आरबीआय’ने बँकांना केली आहे. त्यामुळे गृहकर्ज, कारलोन आणि इतर कर्जांवरील व्याजदर कमी होणार आहेत.

गृह कर्जदारांना असा दिलासा मिळेल
कर्जाची रक्कम – 3000000
कर्ज परतफेड मुदत – 20 वर्षे
सध्याचा व्याजदर – 8.6 टक्के
ईएमआय – 26,225
नवीन व्याजदर – 8.35 टक्के
नवीन ईएमआय – 25751
ईएमआयमध्ये कपात – 474 रुपये

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केलेली पाव टक्क्याची कपात हा निश्चितच स्वागतार्ह निर्णय आहे. मात्र या निर्णयाची खासगी बँकांकडून तातडीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. बँकांनी ही कपात कागदावरच ठेवली तर सर्वसामान्यांना याचा दिलासा कसा मिळणार? – सुशांत चव्हाण, मुलुंड

रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे घर खरेदी करणाऱया सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजच्या घडीला तुटपुंज्या पगारातून गृह कर्जाचा हप्ता भरणे डोईजड होत आहे. अशा स्थितीत व्याज दर कमी झाल्यास आनंदच होईल. खासगी बँकांनी ग्राहकांना या निर्णयाचा तातडीने लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा.- प्रवीण पाटील, अलिबाग

भविष्यात व्याजदर आणखी कमी होण्याचे संकेत हिंदुस्थानचा आर्थिक वृध्दीचा दर जानेवारी ते मार्च या तिमाहीत 5.8 टक्के इतका कमी झाला. अशा परिस्थितीत व्याजदर चढे ठेवणे आर्थिक वृध्दीवर परिणाम करणारे ठरले असते. हे लक्षात घेऊन रीझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात केली. यापुढेही रीझर्व्ह बँकेकडून असेच नरमाईचे धोरण ठेवले जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच भविष्यात व्याजदरात आणखी कपात करण्याचे संकेतच रीझर्व्ह बँकेने दिले आहेत.

– डॉ. अभिजीत फडणीस (अर्थतज्ञ)

जीडीपी 7 टक्के राहणार
रिझर्व्ह बँकेने आज आपल्या पतधोरणात 2019-20 साठीचा जीडीपी 7 टक्क्यांपर्यंत असा अंदाज वर्तविला आहे. एप्रिल महिन्यात रिझर्व्ह बँकेने जीडीपीचे उद्दिष्ट 7.2 टक्के ठेवले होते.

एनईएफटी, आरटीजीएसला आता चार्ज नाही
– एका बँकेतून दुसऱया बँकेतील खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी एनईएफटीचा वापर केला जातो. यासाठी ग्राहकाकडून शुल्क आकारण्यात येते. यापुढे शुल्क रद्द होणार आहे.

– सध्या ‘आरटीजीएस’च्या माध्यमातून 2 ते 5 लाख रुपयांची रक्कम पाठविण्यासाठी 25 रुपये शुल्क अधिक जीएसटी आकारला जातो. 5 लाखांपेक्षा जास्त रकमेसाठी 50 रुपये अधिक जीएसटी घेतला जातो. आता ही सुविधा निशुल्क असणार आहे.