
नगर जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला सराईत आरोपी हा लपूनछपून नगर शहर परिसरातच वास्तव्य करीत असल्याचे आढळून आले असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला सापळा रचून पकडले आहे. दिनेश तुळशीराम वाघमारे, (रा. हरीमळा, सोलापूर रोड, नगर) असे या आरोपीचे नाव आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना जिह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना तपासून जास्तीत जास्त हद्दपार आरोपींविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पथक त्या आरोपींचा शोध घेत असताना दिनेश वाघमारे हा हद्दपार असताना लपूनछपून त्याच्या घरी राहत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सोलापूर रोडवरील हरीमळा येथील वाघमारेच्या घराजवळ सापळा रचला. काही वेळाने तेथे आलेल्या वाघमारे याला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. वाघमारे याला 17 जानेवारी 2022 रोजी 2 वर्षांसाठी नगर जिह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे. त्याच्याविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सहायक फौजदार मनोहर शेजवळ, भाऊसाहेब काळे, हेडकॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, विश्वास बेरड, पोलीस नाईक शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, रवि सोनटक्के व कॉन्स्टेबल रणजित जाधव यांनी ही कारवाई केली.

























































