धावत्या लोकलमध्ये प्रवाशाला मारहाण करून लुटणारी दुकली गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रात्रीच्या वेळेस प्रवास करणाऱया एका प्रवाशाला धावत्या लोकलमध्ये मारहाण करून त्यांचा मोबाईल लुटून नेणाऱया दोघांना रेल्वे गुन्हे शाखेच्या वडाळा युनिटने शोधून काढले. आरोपींकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.

गौरव (नाव बदललेले) हे कुर्ला ते पनवेल असा लोकलने प्रवास करत असताना खारघर रेल्वे स्थानकाजवळ दोघा तरुणांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गौरव यांचा मोबाईल हिसकावून आरोपींनी धावत्या लोकलमधून उडी टाकून पोबारा केला. याप्रकरणी गौरव यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या वडाळा-वाशी युनिटने गुह्याचा समांतर तपास सुरू केला. खबऱयांचे जाळे पसरवून तांत्रिक बाबींचा अभ्यास सुरू केला. तेव्हा गौरव यांनी सांगितलेल्या वर्णनाचा तरुण चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात असल्याची माहिती खबऱयाकडून मिळताच पोलिसांनी लाल डोंगर गाठून आदित्य गायकवाड (24) आणि सुशांत अगवणे (23) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुह्याचा कबुली देताच त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला.