पुस्तकांनी दिली पॉझिटिव्ह एनर्जी!

454

>> राहुल मगदूम, अभिनेता

लॉकडाऊनची वेळ ही सगळ्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच आलीय. अशापद्धतीनं अचानक लॉकडाऊन होऊन आपल्या सगळ्यांना घरीच बसून राहावं लागेल असा विचार कुणी स्वप्नातही केला नसावा. गेल्या चार-पाच वर्षांपासून मी मनोरंजनाच्या क्षेत्रात असल्यानं कामानिमित्त माझी सतत धावपळ व्हायची. नवीन लोकांच्या गाठीभेटी व्हायच्या. लॉकडाऊनच्या काळात इतर उद्योगधंद्यांप्रमाणे मनोरंजनसृष्टी पूर्णपणे ठप्प झाली. सगळ्यांप्रमाणे मी देखील घरीच होतो.

बऱयाच वर्षांनी कुटुंबियांसोबत निवांंत वेळ घालवता आला. शूटिंगला जाण्याची धाकपळ नव्हती कि कुणाला भेटण्याची धडपड. सारं काही शांत होतं.

घरात बसून राहण्याची सवय नसल्याने सुरुवातीला दिवस खूप मोठा काटायचा. अशावेळी मी कोणत्या ना कोणत्या कामात स्वतःला गुंतवले. मी ग्रामीण भागातला असल्यानं शेतीची काम माझ्यासाठी नवीन नाही. परंतू मालिकांच्या शूटिंगमुळे गेल्या काही वर्षांत शेतातली काम करायला केळ मिळाला नव्हता. या काळात मी उस लावणे, त्याला पाणी घालणे, तण वाढणे अशी काम केली. कोरोनाच्या संकटात मला पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली ती पुस्तकांमुळे. शेतातली काम उरकल्यानंतर दुपारी आंब्याच्या झाडाखाली पुस्तकं वाचण्याची बात काही औरच. वपू आणि अण्णाभाऊ साठे हे माझे आवडते लेखक. त्यांची बरीचशी पुस्तकं सुट्टीत वाचली. पुस्तकांमुळे मला एकटेपणा कधीच जाणवला नाही. याशिवाय सध्या कलाक्षेत्रात काय सुरूयं याचा अंदाज घेण्यासाठी वेबसिरीज पाहिल्या. ’नाटय़रंग’ या ग्रुपच्यावतीने आम्ही काही गरजूंना धान्याचे वाटप केलं.

खरं तर मार्च आणि मे हे दोनच महिने मी घरात होतो. एप्रिल महिन्यात आम्ही ’टोटल हुबलाक’ मालिकेचे 20 ते 22 दिवस शूटिंग केले. लॉकडाऊनमध्ये शूटिंग होणारी ही पहिलीच मालिका होती. वाई ग्रीन झोनमध्ये असल्याने तिथे सर्क नियमांचे पालन करून आम्ही या मालिकेचे शूटिंग केले. त्यासाठी 14 दिवस आधीच क्कारंटाईन झालो होतो. 25 जणांचं काम आम्ही दहा, बारा जणांनीच केलं.लॉकडाऊनमध्ये टीव्हीवर जुन्या मालिका सुरू होत्या. रिपीट एपिसोड पाहून प्रेक्षकाही कंटाळले होते.

त्यामुळं प्रेक्षकांचं मनोरंजन होऊन त्यांच्या चेहऱयावर हसू फुलवण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न होता. वाघोबा प्रॉडक्शन आणि तेजपाल वाघ यांचे मनापासून आभार मानतो. कारण त्यांच्यामुळे लाईट, कॅमेरा, ऍक्शन हे शब्द या काळात माझ्या कानी पडले.

स्वत:ला वेळ द्या !

धाकपळीच्या आयुष्यात आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ नसतो. या काळात मी स्कतःला डेव्हलप करण्यावर भर दिला. मग ते फिटनेसच्या बाबतीत असो किंवा भाषेच्या. रोज सकाळी उठून योगा, सूर्यनमस्कार करायचो. धावपळीच्या आयुष्यात स्वतःला वेळ दिला तरच आपल्याला आपल्यातील त्रुटी समजतील, हे यादरम्यान प्रवर्षानं जाणवलं.

आपली प्रतिक्रिया द्या