
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेले शो चालू करण्यासाठी फेडरेशन ऑफ आर्टिस्ट असोसिएशनचे सर्व कलाकार, तंत्रज्ञ आणि आर्टिस्ट यांनी त्यांचा रोजगार चालू करावा यासाठी दादर येथील चैत्यभूमीजवळ आंदोलन केले.
अनलॉकच्या टप्प्यात उद्योगधंदे, शासकीय आणि खासगी कार्यालये टप्प्याटप्प्याने सुरक्षेचे नियम आणि अटीशर्थी घालून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्याच धर्तीवर सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्या, अशी मागणी करत राज्यभरातील लोककलावंतांनी बुधवारी त्यभूमीजवळ एल्गार केला. यावेळी सुमारे 200 संस्थांचे कलावंत, वादक, निर्माते सहभागी झाले होते. कोरोनामुळे कलावंतांची उपासमार होत असून सरकारने लक्ष दिले नाही, तर येत्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
फेडरेशन ऑफ आर्टिस्ट असोसिएशनच्या एल्गार मोच्र्यात गायक, वादक, कव्वाल, लोककलावंत, ढोलपथक, बँडपथक, निवेदक, नकलाकार, इव्हेंट मॅनेजमेंट व्यावसायिक, डोअरकीपर्स, कॅटरींग व्यावसासिक, मेकअपमॅन, वेशभूषाकार, तंत्रज्ञ, निर्माते मोठ्या संख्येने सहभागी झाले. ज्येष्ठ भजन गायक अनुप जलोटा, अभिनेते विजय पाटकर, अन्वर जानी, आगरी कोळी गीतांचे बादशाह दादूस, जाहिद नाझा आदी कलाकार उपस्थित होते. आजच्या एल्गार मोच्र्यात दोन ते तीन हजार कलावंत उपस्थित राहिल्याचा दावा संघटनेने केला. रत्नागिरी, नागपूर, पुणे येथील विविध संघटनांनी पाठिंब्याचे पत्र दिल्याचे ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र, मुंबईचे संघटना सुभाष जाधव यांनी सांगितले. कोरोना काळात सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून कमीत कमी 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरू करण्यास परवानगी दिली तर निर्माते जगतील, असे सुभाष जाधव म्हणाले.
काय आहेत मागण्या
- विविध क्षेत्रातील लोककलावंत, तंत्रज्ञ आणि निर्माते यांना दर महिन्याला 5 हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान द्यावे. किमान पाच लाख बिनव्याजी परतफेड पद्धतीनुसार कर्ज उपलब्ध करून द्यावे.
- कलावंतांच्या कुटुंबाला केंद्र व राज्य सरकारने विनामूल्य वैद्यकीय आरोग्य सेवा द्यावी. तसेच कलाक्षेत्रातील मंडळींची नोंद करून सरकारी ओळखपत्र आणि सवलती द्याव्यात.
- बंदिस्त सभागृह, नाट्य वा सिनेमागृहे आणि सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची तत्काळ परवानगी द्यावी.
- सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रमांची वेळ रात्री 10 ऐवजी 12 वाजेपर्यंत करावी.






























































