लॉकडाऊन संपला! कोरोना संपलेला नाही!!

जीवनाला गती देण्यासाठी, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी लोक घराबाहेर पडत आहेत. सणासुदीचे दिवस आहेत. बाजारपेठांमध्ये उत्साह दिसत आहे; परंतु या काळात निष्काळजीपणा नको, अधिक सावधगिरी बाळगा. कारण लॉकडाऊन संपला आहे, कोरोना व्हायरस संपलेला नाही असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे. लस येईपर्यंत कोरोना विरुद्धचा लढा सुरूच ठेवायचा आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित केले. दसरा-दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर जनतेने खबरदारी बाळगण्याचे आवाहन करताना कोरोनापासून बचावासाठी काय काळजी घेतली पाहिजे याबाबत सूचना केल्या आहेत.

देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जनता कर्फ्यूपासून देशवासीयांनी मोठा प्रवास केला आहे. गेले 7-8 महिने प्रत्येक नागरिकांनी परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही यासाठी प्रयत्न केले. आगामी काळातही यात ढिलाई नको. सांभाळलेली परिस्थिती बिघडू नये यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. वेळेसोबत आर्थिक घडामोडींना चालना मिळत आहे. लोक आपल्या जबाबदाऱया पार पाडण्यासाठी रोज घरातून बाहेर पडत आहेत. सणासुदीचे दिवस असल्याने बाजारपेठांमध्ये पुन्हा उत्साह दिसत आहे. परंतु लॉकडाऊन संपला आहे; कोरोना संपला नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.

मास्कशिवाय तुम्ही घराबाहेर पडत असाल तर तुम्ही कुटुंबातील लहान मुले आणि वृद्धांना धोक्यात टाकत आहात हे लक्षात ठेवा. कोरोनावर लस येत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. त्यामुळे मास्कचा वापर, दो गज दुरी आणि साबणाने, सॅनिटायझरने हात धुणे हे सुरूच ठेवावे लागेल. यात कोणतीही ढिलाई नको. निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो. जगातील साधन-संपन्न देशांच्या तुलनेत हिंदुस्थान नागरिकांचे जीवन वाचविण्यात यशस्वी ठरला आहे. रिकव्हरी रेट चांगला आहे. देशात 10 लाख नागरिकांमागे 5500 लोक कोरोना संक्रमित आहेत. अमेरिका, ब्राझिलमध्ये 10 लाखांमागे 25 हजार लोकांना संसर्ग आहे. आपल्या देशात 10 लाखांमध्ये मृत्यूचे प्रमाण 83 आहे. तर अमेरिका, स्पेन, ब्रिटन, ब्राझिलमध्ये हे प्रमाण 600 आहे.देशात 10 कोटींवर कोरोना चाचण्या झाल्या आहेत. देशात 2 हजार कोरोना लॅब आहेत. 90 लाख बेड आणि 12 हजार क्वारंटाईन सेंटर्स आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

प्रत्येक नागरिकापर्यंत लस पोहोचविण्याचे काम वेगाने सुरू

हिंदुस्थानात कोरोनावरील अनेक लसींचे काम सुरू आहे. तज्ञ यासाठी खूप मेहनत घेत आहेत. कोरोनाची लस येईल तेव्हा प्रत्येक नागरिकापर्यंत लस पोहचविण्यात येईल. त्यासाठी सरकारकडून वेगाने काम सुरू आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

हे वागणे योग्य नाही!

सणासुदीच्या दिवसात बिलपूल निष्काळजीपणा नको. अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. पह्टो, व्हिडीओ मी पाहतो तेव्हा अनेक लोक निष्काळजीपणाने घराबाहेर पडताना दिसतात. लोक सावधानता बाळगताना दिसत नाहीत. लोकांचे असे वागणे योग्य नाही.

अमेरिका, युरोपात पुन्हा रुग्ण वाढताहेत

अमेरिका, युरोपातील देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होत होती. परंतु ही संख्या पुन्हा वेगाने वाढताना दिसत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या