बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी अंदाजे 63 टक्के मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजेश देशमाने । बुलढाणा

बुलढाणा लोकसभा निवडणूक 2019 साठीचा महासंग्राम हा गुरुवार गुरुवार 18 एप्रिल रोजी, बुलढाणा मतदार संघात संपला. येत्या 23 मे रोजी या महासंग्रामाचा फैसला होणार असून ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालेले 12 उमेदवारांचे भाग्य त्यातून बाहेर येणार आहे. बुलढाणा मतदार संघात सर्वत्र शांततेत मतदान झाले, कुठेही अनुचीत प्रकार घडला नाही. सायंकाळी 6 पर्यंत अंदाजे 63 टक्क्यांपर्यंत मतदानाची आकडेवारी गेल्याचे अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. सिंदखेडराजा मतदार संघातील दुसरबीड येथील मतदार केंद्रावर रात्री आठ वाजेपर्यंत मतदान सुरुच होते. मतदान सुरु असताना यंत्र बंद पडल्याच्या 26 ठिकाणी घटना घडल्या. परंतु लगेच मतदान यंत्र बदलून देण्यात आले होते. तर रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य या समस्येवरुन जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा, चाळीसटपरी, तर मेहकर तालुक्यातील रत्नापूर गावाने मतदानावर बहिष्कार टाकला.

सकाळी 7 वाजता मतदानाला आरंभ झाला, तर हे मतदान सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालले. अनेक ठिकाणी शेवटच्या टप्प्यात मतदान केंद्रावर गर्दी झाल्यामुळे ते सायंकाळी उशीरापर्यंतही सुरु होते. सर्वच उमेदवारांनी तथा राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या मतदानात कुटुंबीयांसह उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तरुणांसह वृध्दांचाही सहभाग मतदानासाठी वाटत होता. शहरी तथा ग्रामीण भागातही मतदान शांततेत पण उत्साहात झाले. यावर्षी प्रथमच दिव्यांग मतदारांसाठी वाहन सुविधा, दिव्यांग मतदान केंद्र, सखी मतदान केंद्र उभारले होते. अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर रांगोळी, फुगे आदींद्वारे आकर्षक सजावट केली होती. या मतदान केंद्रामध्ये संपूर्ण कर्मचारी महिला होत्या. त्यामुळे आयोगाने महिला कर्मचार्‍यांची घेतलेली विशेष काळजी यावरून प्रकर्षाने दिसून आली. यावेळी आयोगाने मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्राथमिक उपचारांची सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. व्हिल चेअर सुविधेचा लाभ दिव्यांग मतदारांनी मतदानावेळी घेतल्याचे निदर्शनास आले. बुलढाणा शहरातील उत्कृष्ट मतदान केंद्र म्हणून भारत विद्यालयातील मतदान केंद्र ठरले. या मतदान केंद्रांवर मतदारांचे स्वागत करण्यात आले, तसेच मतदान जनजागृतीची गो व्होट रांगोळी साकारण्यात आली. युवा मतदारांचा कमालीचा उत्साह मतदानात दिसून आला. अनेक युवा मतदारांनी मतदान केल्यानंतर सेल्फी काढली. आपल्या आई-वडिलांसह युवा मतदार मतदानाला आले.

बुलढाणा शहरातील शासकीय अध्यापक विद्यालयातील मतदान केंद्रांवर 102 वर्षीय वृद्ध वामन भैरव पांडे यांनी मतदानाचा हक्क बजाविला. मतदारसंघात सर्वात वयस्कर मतदार म्हणून त्यांनी मतदान केल्याचे निदर्शनास आले. तसेच जलंब ता. शेगांव येथील मतदान केंद्र व शारदा विद्या मंदीर येथील मतदान केंद्रांवर बोहल्यावर चढण्याआधी नवरदेवांनी मतदानाचा हक्क बजाविला. आधी लगीन लोकसभेचे म्हणत त्यांनी मतदान केले. अशाप्रकारे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सर्वत्र शांततेत, उत्साहात मतदान पार पडले.

बुलढाणा लोकसभा मतदार संघात सकाळापासून मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. सकाळी 9 वाजेपर्यंत 8 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदारांचा ओढा वाढला व सकाळी 11 पर्यंत 20.54 टक्के मतदान झाले. दुपारी 2 वाजेपर्यंत ही आकडेवारी 34.31 टक्क्यांपर्यंत गेली. भर उन्हात देखील मतदार बाहेर पडले व दुपारी 3 वाजेपर्यंत 45.9 टक्के मतदान झाले तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.10 टक्के मतदान झाले. त्यामध्ये बुलढाणा विधानसभा क्षेत्रात 50.42 टक्के चिखली मतदार संघात 56 टक्के सिंदखेडराजा मतदार संघात 57.2 टक्के, मेहकर मतदार संघात 58.85 टक्के, खामगाव विधानसभा मतदार संघात 60.15 तर जळगाव जामोद विधानसभा क्षेत्रात 60.5 टक्के मतदान झाले. तर 5 वाजेनंतर देखील उन उतरल्यानंतर अनेक मतदार केंद्रावर रांगा लागलेल्या दिसल्या. सायंकाळी 6 वाजेपर्यंत जे मतदान केंद्रावर पोहचले त्यांचे मतदान करुन घेण्यात आले. दुसरबीडसह अनेक ठिकाणी रात्री 8 वाजेपर्यंत मतदान चालले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी ‘सामना’शी बोलताना सांगितले की, 63 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. मतदानाची अंतिम आकडेवारी येण्यास सकाळ होवू शकते. परंतु पाच वाजेनंतर 57 टक्के होते. तर पाच टक्के मतदान वाढू शकते. त्यानुसार 63 टक्के मतदान झाले असेल त्यानुसार बुलढाणा मतदार संघात 55 टक्के, चिखली मतदार संघात 61 टक्के, सिंदखेडराजा मतदार संघात 62 टक्के, मेहकर मतदार संघात 63 टक्के तर खामगाव मतदार संघात 65 टक्के तर जळगाव जामोद विधानसभा क्षेत्रात 65 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.

या निवडणुकीमध्ये एकूण 12 उमेदवारांनी सहभाग घेतला होता. त्यात मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ.राजेंद्र शिंगणे तर शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांच्यात होती. वंचीत बहुजन आघाडीचे उमेदवार आमदारबळीराम सिरस्कार यांच्यामुळे लढतीची चुरस वाढली आहे. बहुजन समाज पार्टी व अपक्षांच्या उमेदवारांमुळेही लढतीची रंगत वाढलेली आहे. या निवडणुकीत ‘नोटा’ हे नकाराधिकाराचे बटन आले होते. त्याचा वापर किती जणांनी केला? हे पाहणेही रंगतदार ठरणार आहे. बुलढाणा लोकसभा मतदार संघ हा महाराष्ट्रासाठी विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जातो. महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याचे मतदान गुरुवार झाले असल्याने, महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्राचे लक्ष विदर्भाकडे लागले होते. त्याचे प्रवेशद्वार म्हणून बुलडाणा मतदार संघात झालेली लढत राजकीय क्षेत्रासाठी लक्षवेधी ठरली!

मतदानाअगोदर 105 तर मतदानादरम्यान 26 मतदान यंत्र पडले बंद
बुलढाणा लोकसभा मतदार संघात मतदानाअगोदर सकाळी साडेपाच ते सात दरम्यान मतदान अधिकार्‍यांनी मतदान यंत्राची ट्रायल घेतली असता मतदार संघात 105 मतदान यंत्र नादुरुस्त आढळून आले. तेथील मतदान यंत्र मतदान सुरु होत्या अगोदर लगेच बदलून देण्यात आले. तर मतदान सुरु झाल्यानंतर 13 ठिकाणच्या मतदान यंत्रात बिघाड झाले. ते सुद्धा बदलून देण्यात आले होते. त्यामध्ये बुलढाणा विधानसभा क्षेत्रातील एक, चिखली विधानसभा क्षेत्रातील चार, मेहकर विधानसभा क्षेत्रातील चौदा, खामगाव विधानसभा क्षेत्रातील चार व जळगाव जामोद विधानसभा क्षेत्रातील तीन ठिकाणचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे कुशल नियोजन
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. निरुपमा डांगे व जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रशासकीय यंत्रणा गतीमान केली. त्याच बरोबर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले. मतदानाच्या दिवशी देखील मतदानाचे तसेच पोलीस बंदोबस्ताचे कुशल नियोजन केले. त्यामध्ये जिल्ह्यात निवडणुकीत प्रथमच कुठेही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले. मतदानाचा टक्का वाढला याचे श्रेय जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांना जाते.