
सामना प्रतिनिधी । प्रतिनिधी
काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पक्षश्रेष्ठींकडून न्याय मिळत नसल्याचे पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याच धर्तीवर मी देखील कोणताही पवित्रा घेऊ शकतो, असा इशारा देऊन माजी मंत्री अनीस अहमद यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला. ‘अल्पसंख्याक व दलितांना विश्वासात न घेताच लोकसभेचे उमेदवार दिले. काँग्रेसने या घटकांना गृहित धरू नये. याची मोठी किंमत पक्षाला मोजावी लागेल’, असा इशाराही अहमद यांनी दिला. सोमवारी नागपुरात काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
काँग्रेस उमेदवाराचा अर्ज दाखल करताना अहमद यांनी व्यक्त केलेल्या असंतोषामुळे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही अवाक झाले होते. अनीस अहमद म्हणाले, ‘आमचा राहुल गांधी यांच्यावर विश्वास आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तिकिट वाटपात मोठा गोंधळ घालण्यात आला आहे. यासाठी जबाबदार नेत्यांवर पक्षनेतृत्वाने कारवाई करावी. लोकसभेचे तिकिट वाटप करताना अल्पसंख्याक, दलित या घटकांना विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे या दोन्ही समाजात तीव्र असंतोष आहे. आजपर्यंत काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक दलितांना गृहित धरून त्यांची फसवणूक करीत होता. मात्र, आता अल्पसंख्यांक आणि दलित समाज जागा झाला आहे. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला याची किंमत मोजावी लागेल’, असा इशारा त्यांनी दिला.


























































