
सामना ऑनलाईन । अहमदाबाद
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान 23 एप्रिलला पार पडले आहे. आतापर्यंत एकूण 303 जागांसाठी उमेदवारांचे भविष्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. 17 व्या लोकसभेसीठीच्या पहिल्या तीन टप्प्यातील मतदानाचा आकडा 2014 प्रमाणेच असल्याचे दिसून आले आहे. परंतु गुजरातमध्ये मात्र विक्रमी मतदान झाले असून गेल्या 52 वर्षातील सर्वाधिक मतदानाची नोंद यंदा झाली आहे.
तिसऱ्या टप्प्यात गुजरामधील 26 जागांसाठी मतदान पार पडले. बुधवारी निवडणूक आयोगाने विविध राज्यातील मतदानाची टक्केवारी जाहीर केली. गुजारतामध्ये यंदा 64.11 टक्के मतदान झाले असून 1967 नंतर पहिल्यांदाच मतदानाचा टक्का वाढला आहे. 1967 मध्ये गुजरात लोकसभा निवडणुकीसाठी 63.77 टक्के मतदान झाले आहे. विशेष म्हणजे 2014 मध्ये मोदी लाट असतानाही गुजरातमधील मतदानाचा टक्का 63.6 राहिला होता.
विक्रमी मतदानाचा फायदो कोणाला?
गुजरातमध्ये झालेल्या विक्रमी मतदानाचा फायदा सत्ताधाऱ्यांना होणार की विरोधकांना हे सांगणे सध्या कठीण असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले. राजकीय विश्लेषक हेमंत कुमार यांच्या मते, विक्रमी मतदानाचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. तसेच ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात जास्त मतदान झाले असल्यास याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यंदा आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने निकालात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही ते म्हणाले.
गुजरातमधील वलसाड येथे सर्वाधिक 75.21 टक्के मतदान झाले, गांधीनगरमध्ये 65.57 टक्के तर सौराष्ट्रातील अमरेली येथे सर्वात कमी म्हणजे 55.75 टक्के मतदान झाले. या भागात पाण्याची समस्या असल्याने अनेकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याचे दिसले.
दरम्यान, तिसऱ्या टप्प्यात 4 कोटी 51 लाख मतदानरांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 91 जागांसाठी 60 टक्के मतदान, तर दुसऱ्या टप्प्यात 95 जागांसाठी जवळपास 68 टक्के मतदान झाले होते. तिसऱ्या टप्प्यात 117 जागांसाठी 65 टक्के मतदान झाल्याने आयोगाने सांगितले.

























































