Lok Sabha 2019 ठाणे कल्याणमध्ये विकासाला मिळणार पावती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,कल्याण

कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे यावेळीही शिवसेना-भाजप युतीचा भगवा येथे फडकणार असा युतीच्या कार्यकर्त्यांना प्रबळ विश्वास आहे. मेट्रो, मुरबाड – कल्याण रेल्वे, आरोग्य सेवेचे विस्तारीकरण आदी महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यात शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यशस्वी ठरले आहेत. शिवाय मतदारांशी थेट संपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे.

2014 च्या कल्याण लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे तर मनसेकडून राजू पाटील अशी तिरंगी लढत झाली, मात्र शिवसेनेने एकतर्फी ही निवडणूक जिंकली. 16 मे 2014 रोजी झालेल्या मतमोजणीत विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करून तब्बल अडीच लाखांच्या मताधिक्याने डॉ. श्रीकांत शिंदे विजयी झाले होते. पाच वर्षांपूर्वीच्या पराभवाच्या धक्यातून विरोधक अजूनही सावरलेले नाहीत. त्यामुळे यावेळची निवडणूकही शिवसेनेला आव्हान देईल अशी मुळीच नाही. आता वाढीव दीड लाख मतदार मिळून 21 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज झाले आहेत.

ठाणे लोकसभा मतदारसंघ हा केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण  देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मीरा-भाईंदर, ओवळा-माजिवडा, कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, ऐरोली आणि बेलापूर हे विधानसभा मतदारसंघ ठाणे लोकसभाअंतर्गत येतात. शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी पाच वर्षे विकासकामांचा झपाटा लावल्याने विरोधकांची बोलतीच बंद केली आहे. रेल्वे, मेट्रो, क्लस्टर, पूल, सॅटीस अशी विकासाची अनेक कामे मार्गी लावली. या विकासकामांच्या जोरावरच यावेळची निवडणूकही लढवली जाणार आहे. कारखाने, कार्यालये तसेच मध्यमवर्गीयांचे व्यवसाय येथे आहेत. मात्र येथील मतदारांनी नेहमीच युतीला कौल दिला. गेल्या वेळेस शिवसेनेचे राजन विचारे यांना 5लाख 95 हजार एवढी मते मिळाली होती, तर राष्ट्रवादीचे संजीव नाईक यांना 3 लाख 14 हजार 65 मते मिळाली. 20 लाख 73 हजार 252 एवढे मतदार होते. आता मतदारांची संख्या वाढली असून नवमतदारही युतीच्याच बाजूने ठाम उभे राहतील. एकीकडे विचारे यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला असताना विरोधकांकडे मात्र उमेदवार कोण याची फक्त चाचपणीच अद्याप सुरू आहे.