
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशचा आपला पारंपारिक मतदारसंघ अमेठी येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. अमेठीच्या या मतदारसंघात त्यांच्यासमोर भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे आव्हान आहे. या जागेवरून दोन्ही पक्षांमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. राहुल गांधी यांनी अर्ज दाखल केल्यानंतर इराणी यांच्या जोरदार हल्लाबोल केला आहे. या दरम्यान त्यांनी राहुल गांधी यांना अमेठीचे सिंगापूर झाले ना? असा बोचरा सवाल केला.
राहुल गांधी हे 2004 पासून अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवत आले आहेत. यंदा ते चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. येथे निवडणूक लढवताना अमेठीचे सिंगापून बनवण्याचे आश्वासन ते सातत्याने देत आले आहेत. परंतु खरी परिस्थिती मात्र वेगळी आहे. याचाच उल्लेख करताना स्मृती इराणी यांनी म्हटले की, राहुल गांधींनी अमेठीवासीयांचा छळ केला आहे. गेल्या पाच वर्षात अमेठीचा जो विकास झालाय तो भाजप सरकारने केला आहे. शेतकरी, गरीब आणि व्यापाऱ्यांसोबत आमचे सरकार सदैव उभे असल्याचा उल्लेखही यावेळी इराणी यांनी केला. तसेच येथून पळून जाणार नाही आणि तुमच्या हक्काची लढाई लढत राहील असे आश्वासन देत राहुल गांधींच्या वायनाड येथून लढण्याच्या निर्णयाचा उल्लेख न करत इराणींनी हल्ला चढवला.
दरम्यान, मंगळवारी राहुल गांधी यांनी अमेठीमध्ये रोड शो करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा, रॉबर्ट वढेरा आणि त्यांचे दोन्ही मुलं रिहान व मिराया हे सोबत होते.



























































