तब्बल आठ वेळा मतदान करणाऱ्या व्यक्तीला अखेर अटक, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कारवाई

निवडणूक आयोगाने ईव्हीएम हॅक करणे तसेच ईव्हीएममधून कोणतेही गैरप्रकार घडण्याचे दावे फेटाळून लावले असतानाच उत्तर प्रदेशात तब्बल आठ वेळा भाजपला मत देतानाचा व्हिडीओच व्हायरल झाला आहे. त्यामुळे ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून याप्रकरणी आता निवडणूक आयोग काय करणार, असा सवाल विरोधी पक्षांकडून केला जात आहे. दरम्यान, व्हिडीओमधील तरुण हा एका भाजप कार्यकर्त्याचा मुलगा असल्याचे समजते. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगावर (ECI) प्रचंड टीका झाली. अखेर या मुलाविरोधात कारवाई करण्यासाठी पावलं उचलण्यात आली. त्याला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.

काँग्रेसने आणि अखिलेश यादव यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून यावरून निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. अखिलेश यादव यांनी या पोस्टसोबत एक पोस्ट शेअर करत निवडणूक आयोगासह भाजपला फटकारले आहे. निवडणूक आयोगाला हे चुकीचे वाटत असेल तर ते कारवाई करतील, अन्यथा भाजपची बूछ कमिटी ही लूट कमिटी आहेच, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली आहे.

निवडणूक कर्मचाऱयांची टीम निलंबित

नयागाव येथील बुथ पॅप्चरिंगचा लाइव्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने कठोर भूमिका घेत या बुथवरील निवडणूक कर्मचाऱयांची संपूर्ण टीमच निलंबित केली आहे, तर आठ वेळा मतदान करणारा आरोपी राजन सिंह याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक कर्मचाऱयांची कसून चौकशी करण्यात येणार असून त्यांना अटक होण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, संबंधित मतदान पेंद्रावर पुन्हा निवडणूक होणार आहे. पुन्हा जर अशाप्रकारची घटना घडली तर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी नवनीत रिनवा यांनी दिला आहे.

लोकशाहीला लुटण्याचा प्रयत्न – राहुल गांधी

आपला पराभव समोर बघून भाजप जनादेशाला डावलण्यासाठी सरकारी यंत्रणांवर दबाव टाकून लोकशाहीला लुटण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व निवडणूक अधिकारी त्यांची संविधानिक जबाबदारी विसरणार नाहीत अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे, नाहीतर इंडिया आघाडीचे सरकार बनताच अशी शिक्षा करू की यापुढे कुणी संविधानाच्या शपथेचा अवमान करण्याआधी 10 वेळा विचार करेल, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे. अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आठवेळा मतदान करण्याच्या घडल्या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.