
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना अद्याप भाजपमध्ये प्रवेश मिळालेला नाही; पण तरीही त्यांनी भाजप कार्यालयात जाऊन भाजप कार्यकर्त्यांच्या जोरबैठका घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झालेला आहे. भाजप कार्यालयातील या घुसखोरीवर भाजपचे नेते आणि खडसेंचे राजकीय विरोधक गिरीश महाजन यांनी निशाणा साधला आहे. आधी आमदाराकीचा राजीनामा द्या आणि मगच भाजपचा प्रचार करा, अशी टीका केली आहे.
एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे, पण प्रत्यक्ष त्यांनी अजून भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. पण तरीही ते जळगाव जिह्यातील यावल येथील भाजपच्या प्रचार कार्यालयात जाऊन बसले. प्रचाराबाबत त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आणि प्रचाराबाबत सूचनाही केल्या. त्यामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.
प्रवेशाची केवळ औपचारिकता शिल्लक
भाजपच्या कार्यालयात घेतलेल्या बैठकांबाबत स्पष्टीकरण देताना एकनाथ खडसे म्हणाले की, भाजप प्रवेशाबाबत वरिष्ठांशी माझी चर्चा झाली आहे. भाजपमधील माझ्या प्रवेशाची औपचारिकताच बाकी आहे. त्यामुळे आपण प्रचारात उतल्याचे खडसेंनी सांगितले. भाजपचे नेते विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला सांगितले आहे की, तुमचा भाजप प्रवेश निश्चित आहे. भाजप प्रवेशासंदर्भातील तारीख आम्ही तुम्हाला कळवू. तोपर्यंत तुम्ही कामाला लागा. त्यांनी मला सांगितल्यामुळे मी भाजपचे काम सुरू केले आहे.
गिरीश महाजन-खडसेंचे वितुष्ट उफाळले
आधी आमदारकीचा राजीनामा द्या आणि मगच भाजपचा प्रचार करा, अशी बोचरी टीका गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर केली. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. कारण एकनाथ खडसे यांची भूमिका संधीसाधूपणाची आहे. विधानसभेत त्यांची मुलगी तुतारी चिन्ह घेऊन निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. घरात सगळेच पक्ष ठेवायचे असे त्यांचे सुरू आहे. त्यांनी आमदारकी आणि खासदारकीसाठी सगळय़ांचे काम करायचे. त्यामुळे त्यांनी एक एक भूमिका घेतली पाहिजे अशी टीका केली.



























































