Lok Sabha Election 2024 : संविधानात जर बदल करायचा असेल आपल्याला बहुमत हवे, भाजप उमेदवाराकडून पुनरुच्चार

भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी काही दिवसांपूर्वी संविधान बदलायचे असेल तर दोन्ही सभागृहांत दोन तृतीयांश बहुमत मिळायला हवे व आपला धर्म वाचवण्यासाठी आम्ही राज्यघटनाच बदलू, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजप उमेदवाराकडून भाजपचे छुपे मनसुबे उघड करण्यात आले आहेत.

भाजपच्या राजस्थान नागौरच्या उमेदवार ज्योती मिर्धा यांनी त्यांच्या प्रचार सभेत भाजप संविधानात बदल करणार असल्याचे सांगितले आहे. ”देशाच्या हितासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यासाठी आम्हाल संविधानात बदल करणे गरजेचे आहे. यासाठी लोकसभा व राज्यसभा अशा दोन्ही सदनात आम्हाला बहुमत हवे आहे. त्यामुळे आता लोकसभेत एनडीएला बहुमत मिळवायचे आहे”, असे ज्योती मिर्धा म्हणाल्या.ॉ

ज्योती मिर्धा यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्योती मिर्धा या राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीआधी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

अनंककुमार हेगडेंनेही केले होते घटनादुरुस्तीचे वक्तव्य

खासदार हेगडे यांनी सिद्धपूर येथील एका सभेत पुन्हा घटनादुरुस्तीचा विषय उपस्थित केला. राज्य घटनेत काँग्रेसने ज्या काही चुका केल्या आहेत आणि अनावश्यक भर घातली आहे ते सुधारणारी घटनादुरुस्ती करण्यासाठी भाजपला संसदेच्या दोन्ही सभागृहांत दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता आहे. हिंदू धर्म वाचवण्यासाठी संविधान बदलणे आवश्यक आहे आणि भाजपने लोकसभेच्या 400 पेक्षा जास्त जागा जिंकल्या तरच भाजप हे करू शकतो, असे हेगडे म्हणाल होते.