ठाणे, कल्याण, संभाजीनगरच्या जागेचा तिढा सुटेना, मिंधे-फडणवीसांची पहाटे 3 वाजेपर्यंत वर्षावर खलबते

महायुतीमध्ये ठाणे, कल्याण आणि संभाजीनगरच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा अजून सुटलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पहाटे तीन वाजेपर्यंत या जागांबाबत ‘वर्षा’ निवासस्थानी चर्चा सुरू होती.

देवेंद्र फडणवीस हे शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ‘वर्षा’ बंगल्यावर पोहोचले. त्यानंतर मिंधे गटाचे उदय सामंतही सव्वाबाराच्या सुमारास पोहोचले. त्यांच्यातील चर्चा इतकी वाढली की, पहाटे तीन वाजेपर्यंत ती सुरूच होती. भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना भाजप कार्यकर्त्यांकडून सहकार्य मिळेल की नाही याबद्दल शंका आहे. भाजप कार्यकर्तेही ती जागा भाजपला मिळावी यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे कल्याणऐवजी श्रीकांत शिंदे यांना ठाण्यामधून रिंगणात उतरवण्याची तयारी मिंधे गटाकडून सुरू आहे. एकनाथ शिंदे यांना आपल्या मुलासाठीच ठाण्याची जागा हवी आहे. दुसरीकडे कल्याणची जागा भाजपला सोडा, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.  महायुतीमधील या तिढय़ामुळेच मिंधे गटाने अद्याप कल्याण मतदारसंघातील उमेदवार जाहीर केलेला नाही.