पंकजांवर टीका केल्याशिवाय बारामतीच्या दरबारात नोकरीच मिळत नाही – सदाभाऊ खोत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sharad-pawar-pankaja-munde

सामना प्रतिनिधी । बीड

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीका केल्याशिवाय बारामतीच्या दरबारात विरोधकांना नोकरीच मिळत नाही, असा टोमणा कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मारला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी देवळा आणि पुस तालुक्यात अंबाजोगाई येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.

‘शरद पवार यांनी राजकीय फायद्यासाठी बीड जिल्ह्याच्या जनतेचा अनेक वर्ष फायदा घेतला. मात्र जिल्ह्याच्या विकासाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले. तसेच कृष्णा खोऱ्याचे पाणी का मिळवून दिले नाही?, असा सवाल देखील सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला.

पंकजा मुंडेंनी कुठलाही भेदभाव न करता सर्व समाजाला समान न्याय दिला असून जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचे योजगान अभूतपूर्व आहे, अशा शब्दात खोत यांनी पंकजा मुंडे यांच्या कामाचे कौतुक देखील केले.

बीड लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या प्रचारासाठी सदाभाऊ खोत यांनी जाहीर सभा घेतल्या. ठिकठिकाणी बोलतांना त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्तमान राजकीय परिस्थितीत शेतकर्‍यांचे हित जोपासणारे सरकार केंद्रात आणि राज्यात असल्याचा उल्लेख करून शेतकर्‍यांच्या बाजूने हे सरकार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र सरकारने गेल्या चार वर्षांपासून राज्यात शेतकर्‍यांच्या हितासाठी अतिशय चांगले निर्णय घेऊन त्यांचा सन्मान वाढवल्याचेही ते म्हणाले. नैसर्गिक आपत्ती असो किंवा इतर संकटे असो शेतकर्‍यांच्या मदतीला धावून येणारे हे सरकार असल्याने लोकांनी आता वैचारिक पातळीवर विचार करावा. पवारांनी मराठवाड्याला कृष्णा खोर्‍याचे पाणी मिळू दिले नाही. मात्र पंकजा मुंडे या पाण्यासाठी सत्तेत संघर्ष करत असून बीड जिल्ह्याला 5 टीएमसी पाणी लवकरच मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.