लोणी काळभोरमध्ये दहशत माजविणारा सराईत स्थानबद्ध, एमपीडीएनुसार 87 वी कारवाई

लोणीकाळभोर परिसरात खंडणी मागून दहशत माजविणार्‍या सराईताविरूद्ध एमपीडीएनुसार कारवाई केली आहे. त्याला एक वर्षांसाठी नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीएनुसार केलेली ही 87 वी कारवाई आहे. त्यामुळे दादागिरी -भाईगिरी करणार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मोन्या उर्फ रोनाल्ड अनिल निर्मळ (वय 24 रा. नवीन कॅनॉल जवळ, म्हातोबाची आळंदी रोड, कुंजीरवाडी, लोणीकाळभोर) असे स्थानबद्ध केलेल्या सराईताचे नाव आहे. मोन्या हा सराईत गुन्हेगार असून त्याने साथीदारांसह लोणी काळभोर परिसरात कोयता, चाकू, तलवार यासारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, खंडणी, घातक शस्त्राने दुखापत करणे, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी पाठविला होता. त्यानुसार पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोन्या निर्मळ याला स्थानबद्ध केले आहे.

भाईगिरी करणारे 87 जण स्थानबद्ध
नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणार्‍या सराईतांविरूद्ध एमपीडीएनुसार कारवाई करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आतापर्यंत 87 जणांना विविध कारागृहात स्थानबद्ध केले आहे. यापुढेही सराईत आणि अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.