
सामना प्रतिनिधी । राहुरी
मुंबई येथे नातेवाईकांच्या दशक्रिया विधीला जात असलेल्या वांबोरी तालुका राहुरी येथील पत्रकार व त्यांच्या चुलत्यांना नगर पुणे रोडवरील कामरगाव घाटात शस्त्राचा धाक दाखवून अज्ञात भामट्यांनी लुटमार केली आहे.
नगर पुणे राज्य मार्गावरील कामरगाव घाटात गुरूवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास लुटमारीची ही खळबळजनक घटना घडली. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील पत्रकार दिपक कांबळे व शंकर नारायण कांबळे हे आपल्या व्हिस्टा कार मधुन नातेवाईकाच्या दशक्रिया विधीला मुंबई येथे जात होते. नगर पुणे राज्य मार्गावरील चासच्या पुढे असलेल्या कामरगाव घाटात त्यांची कार बंद पडली असता पाठीमागच्या बाजुने काळ्या रंगाच्या पल्सरवरून आलेल्या तीघा भामट्यांनी दिपक कांबळे व शंकर कांबळे यांना शस्त्राचा धाक दाखवून खिशातील १२ हजार ९०० रूपयांची रोकड पळवुन नेली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे गस्तीपथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने कांबळे यांच्याकडुन लुटमार करणाऱ्यांच्या वर्णनाची माहिती घेऊन तपास सुरु केला आहे. एल.सी.बी पोलीस निरीक्षक दिलीप पवार व नगर तालुका पोलीस ठाण्याचे ए.पी.आय किशोर परदेशी यांनी चोरट्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
पञकार कांबळे यांना पंधरा दिवसांपूर्वीच पितृशोक झालेला आहे. त्यांच्या दुसऱ्या एका नातेवाईकाचे निधन झाले होते. त्यांच्या दशक्रिया विधीसाठी ते रात्री पुणे मार्गे मुंबईला जात असताना रस्त्यात लुटमारीची ही घटना घडली.
































































