
34 वर्षांपूर्वी रेल्वे प्रवासात महिलेची चोरीला गेलेली सोन्याची चेन वांद्रे रेल्वे पोलिसांनी तिच्या मुलाला परत केली. प्रवासात चोरीला गेलेला मुद्देमाल वाटपाचा आज कार्यक्रम घाटकोपर येथील नवरंग सभागृहात आयोजित केला होता. 104 जणांना मुद्देमाल वाटप करण्यात आला.
रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विविध उपक्रम हाती घेतले आहेत. गुन्ह्यातील मुद्देमाल तक्रारदारांना देण्याकरता त्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. रेल्वे पोलिसांनी गुन्ह्यातील मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम आज आयोजित केला होता. या कार्यक्रमात 104 जणांचा मुद्देमाल त्यांना परत करण्यात आला. 36 वर्षांपूर्वी रेल्वे प्रवास करणार्या कांचनबेन शहा यांची सोन्याची चेन चोरीला गेली होती. त्या प्रकरणी वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. पोलिसांनी तपास करून चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरीला गेलेली सोन्याची चेन जप्त केली. पोलिसांनी कांचन यांच्या घरचा पत्ता शोधून काढला. त्यांच्या मुलाला त्या सोन्याच्या चेनबाबत माहिती दिली. आज मुद्देमाल वाटपात ती सोन्याची चेन पोलिसांनी कांचन यांचा मुलगा दिलीप शहा यांना परत केली. त्यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले. या कार्यक्रमात 104 तक्रारदारांना मुद्देमाल परत केला. सोन्याचे दागिने, रोख रक्कम, कॅमेरा आणि लॅपटॉप असा मिळून 1 कोटी 5 लाख 24 हजारांचा मुद्देमाल परत केला. गेल्या वर्षी रेल्वे पोलिसांनी दिवाळीत 81 जणांना 89 लाख रुपयांचा मुद्देमाल परत केला होता.

























































