
नायगाव, शिवडी येथे बाम्बे डाईंग मिल कामगारांच्या 324 घरांसाठी काढलेली लाटरी उच्च न्यायालयाने रद्द केली. या घरांची सोडत नव्याने काढण्याचे आदेश न्यायालयाने म्हाडाला दिले आहेत.
गिरणी कामगारांसाठी 3350 घरे बांधली आहेत. या घरांच्या लाॅटरीतील 3026 घरांचा ताबा गिरणी कामगारांनी घेतला आहे. 324 जणांच्या अर्जाची छाननी सुरू आहे, अशी माहिती गिरणी विभागाचे उप मुख्य अधिकारी योगेश माने यांनी प्रतिज्ञापत्रावर दिली. या 324 घरांचे वितरण झालेले नाही व या घरांवर कोणी दावा केलेला नाही. या घरांबाबत न्यायालयाने आदेश दिलेले नाही. त्यामुळे या घरांसाठी आधी काढलेली लॉटरी रद्द करून म्हाडाने नव्याने सोडत काढावी, असे आदेश न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. आरती साठे यांच्या खंडपीठाने दिले.
पनवेलचे घर सहा किमी दूर
पनवेल येथील कोन गावात बांधण्यात आलेली घरे आम्हाला देण्यात आली. ही घरे पनवेल रेल्वे स्थानकापासून सहा किमी अंतरावर आहेत. येथे सरकारी बस जात नाही. जवळ हास्पिटल, शाळा नाही. अशा ठिकाणी राहता येणार नाही. आम्ही मुंबईत काम केले आहे. आम्हाला मुंबईतच घर मिळायला हवे, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.
न्यायालयाचे आदेश
324 घरांसाठी नव्याने काढण्यात आलेल्या लाटरीसाठी याचिकाकर्ते माने यांच्यासह चार गिरणी कामगार पात्र असतील. ते सोडतीत सहभागी होऊ शकतील, असे आदेश न्यायालयाने दिले.
हरिश्चंद्र माने यांच्यासह चार गिरणी कामगारांनी ही याचिका केली होती. आम्ही बाम्बे डाईंग मिलमध्ये काम केले आहे. आम्ही नायगाव, शिवडी येथील बाम्बे डाईंग मिल कामगारांच्या घरांसाठी काढण्यात आलेल्या लाटरीत अर्ज भरला. तरीही आम्हाला पनवेल येथे घरे देण्यात आली. आम्हाला नायगाव येथे घरे द्यावीत, अशी मागणी याचिकेत केली आहे.


























































